Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

ससाणेनगर, हांडेवाडी परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण
हडपसर, १४ मे/वार्ताहर

ससाणेनगर, सय्यदनगर, हांडेवाडी, काळेपडळ या परिसरातील नागरिकांना महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आजही पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. कमी दाबाने अनियमित पाणीपुरवठय़ामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

 

महापौरांच्या वॉर्डात पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना आजही वणवण भटकावे लागत आहे, तर काही ठिकाणी नागरिक टँकरने पाणी विकत घेऊन आर्थिक भुर्दंड सहन करीत आहेत. अनेक कामगार पिण्यासाठी दररोज पाच-दहा लिटरच्या कॅनमधून हडपसर गाव आणि परिसरातून पाणी आणत असल्याचे येथील अमीन शेख, उस्मान खान, सुरेखा मोरे, यास्मीन शेख या नागरिकांनी सांगितले.
प्रशासन हंडाभर आम्हाला पाणी देऊ शकत नाही, याला काय म्हणायचे. केवळ पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून पालिकेतील अधिकारी पाणी पुरवठा करण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करून पालिका प्रशासन काय साध्य करू इच्छित आहे, अशा स्वरूपाच्या व्यथा येथील नागरिकांनी मांडल्या.
पालिका, विधानसभा वा लोकसभेच्या निवडणुका आल्या की महापौर स्वत: आमच्या दारात मते मागण्यासाठी येतात. निवडणुकीच्या कालावधीत मात्र भरपूर पाणी सोडण्याची व्यवस्था करून ठेवतात. त्यामुळे त्यावेळी पाण्याच्या प्रश्नाविषयी बोलण्याची वेळ नसते. निवडणुका संपल्या आणि पाण्यासाठी भर उन्हात आम्हाला लहान मुलांना दुसऱ्याकडे ठेऊन किंवा कधी बरोबर घेऊन भटकंती करावे लागत असल्याचे या महिलांनी सांगितले.
रामटेकडी येथील टाकीतील पाणी हडपसर परिसर तसेच बारा वाडय़ावस्त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे हा हेतू असल्याचे निवडणुकांमधून वारंवार पुढारी बोलत होते. मात्र या टाकीतील पाणी सर्वसामान्यांसाठी नाही, असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. या टाकीच्या बांधकामासाठी आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी अथक प्रयत्न केले असले तरी त्यांचे उद्दिष्ट मात्र साध्य झालेले नाही, असे नागरिकांकडून बोलले जात आहे.