Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

कोथरूड गोळीबारप्रकरणी मारणे टोळीतील सहाजणांना अटक
पुणे, १४ मे /प्रतिनिधी

कोथरूड येथे उद्योजकाच्या मोटारीवर काल सायंकाळी गोळीबार करणाऱ्या गजानन ऊर्फ गज्या मारणे टोळीतील सहाजणांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. वारजे येथे राजमुद्रा ढाब्याजवळ आज सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. मारणे मात्र

 

अद्याप पसार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
बाब्या ऊर्फ श्रीकांत पवार, गणेश हुंडारे, बापू बागल, प्रदीप कंधारे, सागर रजपूत, शशांक बोडके (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहाजणांची नावे आहेत. फळे व भाजीपाला आयातनिर्यात करणाऱ्या समीर मदन पाटील (वय ३४, रा. हिरा मॅन्शन, वनाज कंपनीजवळ, कोथरूड) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. पाटील यांच्यासह त्यांचा सहकारी व मोटारचालकावर काल सायंकाळी सातच्या सुमारास मारणे टोळीच्या गुंडांनी गोळीबार केला होता.
कोथरूड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एच. शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘पाटील यांच्या राहत्या घरीच त्यांचे कार्यालय असून दीड महिन्यापूर्वी त्यांच्या कार्यालयाच्या दारासमोर आरोपींनी मोटार लावली होती. मोटार दारासमोरून काढण्यावरून त्यावेळी पाटील आणि आरोपींची बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यानंतर पाटील यांच्या एका मोटारीच्या काचा फोडल्या होत्या. रस्त्यावरून जाता-येता पाटील यांच्याकडे आरोपी चिडून पाहत असत. बावधन येथील एका लग्न समारंभातून पाटील काल सायंकाळी घरी परतत असताना आरोपींनी पौड रस्त्यावर जनसेवा बँकेजवळ गोळीबार केला व पसार झाले होते. त्यानंतर संपूर्ण शहरामध्ये नाकाबंदी करण्यात आली होती.
पोलिसांकडे तक्रार देताना पाटील यांनी या पूर्ववैमनस्याविषयी माहिती दिल्यावर कोथरूड पोलिसांनी मारणेसह आरोपींचा शोध सुरू केला. आज सायंकाळी पाचच्या सुमारास पवार, हुंडारे, कंधारे या तिघांसह सहाजण राजमुद्रा ढाब्यावर येणार असल्याची खबर मिळाल्यावर तेथे सापळा रचण्यात आला. मात्र गज्या मारणे अद्याप पसार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.’’