Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी तळमजल्यावर जागा - शर्मा
पिंपरी, १४ मे / प्रतिनिधी

ज्येष्ठ नागरिकांना जिने चढण्यास होणारा त्रास लक्षात घेऊन यापुढे पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रांसाठी तळमजल्यांवर जागा उपलब्ध करून दण्यात येईल, अशी घोषणा महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी नुकतीच केली.

 

सांगवी परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या तपपूर्ती सोहळ्याचे उद्घाटन शर्मा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अपर्णा डोके होत्या. व्यासपीठावर नगरसदस्य उषा तथा माई ढोरे, अशोकभाई सोनवणे, प्रशांत शितोळे, शंकर जगताप, फेस्कॉमचे पदाधिकारी रमणभाई शहा, निळकंठ कोडोलीकर तसेच डॉ. इंगोले, डॉ. गुणवंत चिखलीकर, विजय जगताप, सांगवी परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीराम पांडे, कार्याध्यक्ष डॉ. विजय देशपांडे, कार्यवाह प्रफुल्ल अनंतराव, उपाध्यक्ष शालिनी फाटक, सहकार्यवाह अर्जुन सावंत, कोशाध्यक्ष पुंजहरी तुपे आदी उपस्थित होते.
सांगवी येथे महापालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दुसऱ्या मजल्यावर विरंगुळा केंद्र सुरू केल्याने गुडघेदुखीचा अथवा रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असल्याचे डॉ. पांडे यांनी त्यांच्या प्रस्ताविकात निदर्शनास आणून दिले. ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी जमिनीलगत जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यासंदर्भात बोलताना आयुक्त शर्मा म्हणाले की, डॉ. पांडे यांनी केलेली सूचना योग्य असून महापालिकेतर्फे यापुढे ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी जमिनीलगत जागा उपलब्ध करून देण्यात येईल. सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढील वर्षीचा वर्धापनदिन नवीन विरंगुळा केंद्रात सादर होईल, याची ग्वाही महापालिकेतर्फे आपण देतो.
शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेतर्फे चारही प्रभाग कार्यालयांमध्ये एक ते दीड महिन्यात नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणाही शर्मा यांनी केली. शहरात एक एप्रिलपासून सर्वानाच पाणीपट्टीसाठी मीटर पद्धत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा काटकासरीने वापर होऊन सांगवी परिसरातील पाणीपुरवठय़ात सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नागरिकांची विरंगुळा केंद्रे म्हणजे परिपक्व विचारांची देवाण-घेवाण करणारी ठिकाणे आहेत, असे उद्गार महापौर डोके यांनी काढले. ज्येष्ठ नागरिकांचा कामाचा उत्साह व शहराविषयीचे प्रेम विलक्षण आहे. त्यामुळेच शहराच्या विकासाच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन फायद्याचे ठरते, असेही त्या म्हणाल्या. पिंपळे गुरव व सांगवी या दोन्ही ज्येष्ठ नागरिक संघासाठी एक वर्षांच्या आत नवीन विरंगुळा केंद्र व नाना-नानी पार्क या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन माई ढोरे, शंकर जगताप, प्रशांत शितोळे व भाई सोनवणे यांनी दिले. रमणभाई शहा व निळकंठ कोडोलिकर यांचीही या वेळी भाषणे झाली.
सहजीवनाचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असलेल्या शालिनी व शरच्चंद्र फाटक तसेच सुनंदा व नामदेवराव ढोरे या दाम्पत्यांचा कार्यक्रमात महापौरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उतीर्ण झाल्याबद्दल विकास भोसकर या तरुणाचाही गौरव करण्यात आला. डॉ. श्रीराम पांडे यांनी प्रास्ताविक केले तर आभारप्रदर्शन व सूत्रसंचालन डॉ. विजय देशपांडे यांनी केले.