Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘आयएमएसआय तंत्रज्ञानामुळे विनाअपत्य दाम्पत्यांना दिलासा’
िपपरी, १४ मे / प्रतिनिधी

इन्ट्रा सायटोप्लाज्मिक मॉफरेलॉजिकली सिलेक्टेड स्पर्म इंजेक्शन (आयएमएसआय) या अत्याधुनिक यंत्रामुळे पुरुषबीज ७,२०० पट मोठे दिसते. त्यामुळे डॉक्टरांना त्यातल्या त्यात सुदृढ पुरुषबीज निवडणे सोपे जाते. त्यामुळे गर्भधारणा होण्याचे प्रमाण ३० टक्क्य़ांवरून वाढून ६६ टक्के झाले, अशी माहिती मुंबईच्या लीलावती रुग्णालयाच्या वंधत्वनिवारणतज्ज्ञ

 

डॉ. नंदिता पालशेतकर यांनी दिली.
डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील एका कार्यक्रमावेळी पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केला. मुंबई येथील लीलावती रुग्णालयात आयएमएसआय हे प्रगत आयव्हीएफ यंत्र नुकतेच बसविण्यात आले आहे. टेस्टटय़ूब बेबीसाठी वापरण्यात येणाऱ्या या यंत्रातून सुदृढ शुक्राणू निवडणे शक्य होते.
त्यामुळे फलनानंतर निकोप गर्भ तयार होऊ शकतो. इन्ट्रा सायटोप्लाज्मिक स्पर्म एंजेक्शन (आयसीएसआय) यंत्रापेक्षा नवीन यंत्राची प्रतिमा मोठी करून दाखविण्याची क्षमता सोळापट जास्त आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान विनाअपत्य दाम्पत्यांना दिलासा देणारे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
पारंपरिक तंत्रापेक्षा हे पुरुष बीज निवडण्याचे काम सोपे होते. तसेच निकोप पुंबीज निवडता येते, असे प्रसिद्ध स्त्रीरोग व वंधत्वनिवारणतज्ज्ञ डॉ. हृषिकेश पै यांनी सांगितले. ते या पद्धतीमार्फत आकाराने निकोप दिसणारे पुंबीज निवडून त्याच्यापासून गर्भ तयार करीत असत. त्यामुळे गर्भधारणेचे प्रमाण ३० टक्क्य़ांहून ६६ टक्के झाले.
ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंचे प्रमाण कमी असते. त्यांच्यापासून आयव्हीएफ (एन विट्रो फर्टिलायझेशन) तंत्रामार्फत करण्यात येणाऱ्या कृत्रिम गर्भधारणा होण्याची कमी शक्यता असते. त्यामुळे आयएमएसआय पद्धती उपयुक्त ठरते. कारण या पद्धतीमुळे पुंबीज ७२०० पट मोठे करून बघता येते.
ज्या रुग्णांमध्ये शुक्राणूंचे प्रमाण कमी असते अशांना गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते. अशा वेळी हे आयएमएसआय तंत्र उपयुक्त ठरते, असे डॉ. नंदिता पालशेतकर यांनी सांगितले. हे अत्याधुनिक यंत्र महाग असले तरी रुग्णाला त्याचा भार सोसावा लागणार नाही. वाजवी दरात ही पद्धती वापरण्यात येणार असल्याचे डॉ. पै यांनी सांगितले.