Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पाल्यांच्या पाचवीतील प्रवेशासाठी पालकांनी काढली शाळेसमोरच रात्र
शिरूर, १४ मे / वार्ताहर

इयत्ता पाचवी मध्ये पाल्याला प्रवेश मिळविण्याकरिता पालकवर्गाने शाळेसमोर रात्रभर रांग लावून शाळेच्या आवारातच संपूर्ण रात्र काढली.
गेल्या आठवडय़ात शिरूर शहर परिसरातील प्राथमिक शाळेचे निकाल लागले. इयत्ता चौथीमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेण्याकरिता लगबग सुरू झाली. शहरातील नामांकित व दर्जेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर शिक्षण प्रसारक

 

संस्थेच्या विद्याधाम प्रशालेतील मराठी माध्यमातील इयत्ता पाचवीत आपल्या पाल्याला प्रवेश घेण्यासाठी बरेचसे पालक प्रयत्नशील असतात. विद्याधाम प्रशालेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिरूर शहरातील व आसपासच्या परिसरातील वाडीवस्तीवरील विद्यार्थी प्रवेशासाठी येत असतात. शिरूर शहरालगत काही वर्षांपूर्वी रांजणगाव गणपती पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी राहिली. साहजिकच या वसाहतीत काम करण्याकरिता महाराष्ट्रातून व देशभरातून मोठय़ा संख्येने कामगार व अधिकारीवर्ग शिरूर परिसरात वास्तव्याकरिता व रोजगाराकरिता आले आहेत. औद्योगिकीकरणामुळे शिरूर शहर व परिसरातील गावामध्ये मोठय़ा झपाटय़ाने शहरीकरण झाले. लोकसंख्या वाढू लागली. वाढलेल्या शहरीकरणामुळे त्याचे परिणाम शिक्षणक्षेत्रावरही होऊ लागले व त्यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया क्लिष्ट होऊ लागली आहे. शिरूर शहर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे तालुक्यातील व आसपासच्या शेजारील तालुक्यांमधील विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता शिरूरलाच पसंती देतात. बहुसंख्य पालकांची शिक्षणाकरिता पहिली पसंती विद्याधाम प्रशालेला दर्शवितात. साहजिकच यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेतील प्रवेशासाठी मोठी चुरस असते. यंदाच्या वर्षीही इयत्ता ५ वीच्या प्रवेशाकरिता चढाओढ होती. विद्याधाम प्रशालेत ५ वीच्या ६ तुकडय़ा अनुदानित, तर १ विनाअनुदानित तुकडी आहे. प्रशालेतील इयत्ता ४ थीतील १४० विद्यार्थी व लोकसेवा ट्रस्टमधील ८० विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीत प्रवेश दिल्यानंतर उरलेल्या जागांसाठी १३ मे ला प्रवेश प्रक्रिया होती. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश देण्यात येणार होता.
१३ मे रोजी प्रवेशप्रक्रिया असताना पालकांनी मात्र १२ मे च्या दुपारी २ वाजल्यापासूनच शाळेच्या आवारात प्रवेशप्रक्रियेतील रांगेमध्ये उभे राहण्याकरिता गर्दी करण्यास सुरुवात केली. रात्री ८ नंतर तर शाळेचे आवार गर्दीने फुलून गेले. ३०० ते ३५० पालक शाळेच्या आवारात प्रवेश रांगेत ठाण मांडून बसले होते. आपण रांग सोडली तर आपल्या पाल्याचा नंबर जाईल म्हणून सर्व पालकांनी संपूर्ण रात्र शाळेच्या आवारात बसून काढली. १३मेला सकाळी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. आज काही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले, असे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तु. ग. परदेशी यांनी सांगितले. आपल्या पाल्यास याच शाळेत प्रवेश मिळवायचा, या जिद्दीने आलेल्या पालकांनी त्यामुळेच संपूर्ण रात्र शाळेच्या आवारात घालविली.