Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

लिट्ल चॅम्प्स सारेगमप कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद
मंचर, १४ मे / वार्ताहर

निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे माजी आमदार स्वर्गवासी दत्तात्रय गोिवदराव वळसे पाटील यांचा अकराव्या स्मृतिदिनानिमित्त लिटिल चॅम्पस् सारेगमप या कार्यक्रमाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

 

दत्तात्रेय वळसे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार वल्लभ बेनके, वित्त व नियोजनमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, राम कांडगे, सूर्यकांत पलांडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरदराव लेंडे, माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी लिटील चॅम्पस् मुग्धा वैशंपायन, रोहित राऊत, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, काíतकी गायकवाड यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
या वेळी आर्याने सादर केलेले ‘मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना’, काíतकीने ‘अरे कृष्णा, अरे कान्हा, मन रंजन मोहना’, तर मुग्धाने ‘छडी लागे छम छम’, रोहितने ‘आली ठुमकत नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी’, तर प्रथमेशने ‘परि म्हणू की सुंदरा, तिची अदा करी फिदा’ या गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या वेळी अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपले वडील दत्तात्रेय वळसे पाटील यांना आपल्यामधून जाऊन ११ वर्षे झालीत. त्यांचा स्मृतिदिनानिमित्त आपण विविध कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी लिटिल चॅम्पस् हा कार्यक्रम आयोजित केला. ज्यांनी महाराष्ट्रभर तसेच देशात नाव गाजवले असे लिटिल चॅम्पस् बालकलाकार प्रथमच दुबई येथे कार्यक्रमास रवाना होणार असल्याने उपस्थितांच्या वतीने मन:पूर्वक शुभेच्छा देऊन वळसे पाटील म्हणाले, खेडय़ापाडय़ात वेगवेगळय़ा गोष्टींची आवड निर्माण व्हावी, विविध कलादालनात सहभागी होता यावे म्हणून या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतापराव वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, समस्त ग्रामस्थ निरगुडसर यांनी प्रयत्न केले.