Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पोलीस उपअधीक्षक अमोल तांबे यांना पोलीस महासंचालकांकडून विशेष सन्मानचिन्ह
शिक्रापूर, १४ मे / वार्ताहर

गडचिरोली जिल्हय़ातील नक्षलवादी कारवायांना आळा घालण्याबरोबरच त्यातील काहीजणांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्याची विशेष कामगिरी पोलीस उपअधीक्षक अमोल तांबे यांनी केली. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या कामगिरीची दखल घेऊन

 

तांबे यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
गेली दोन वर्षे गडचिरोली जिल्हय़ातील इटापल्ली या नक्षलप्रभाव कार्यक्षेत्रात पोलीस उपअधीक्षक म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल राज्याचे महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे विशेष सन्मानचिन्ह देऊन तांबे यांचा नुकताच गौरव करण्यात आला. मूळचे शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा गावचे असणारे अमोल तांबे हे नुकतेच तासगाव (जि. सांगली) येथे उपअधीक्षकपदी रुजू झाले आहेत. उपअधीक्षकपदी निवड झाल्यानंतर तांबे यांची पहिली नेमणूक नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या गडचिरोली जिल्हय़ातील इटापल्ली येथे झाली. येथील आव्हान स्वीकारून त्यांनी नक्षलवादी व त्यांच्या कारवाया यांचा अभ्यास केला. सरकारी थाट बाजूला ठेवून त्यांनी तेथील नागरिकांमध्ये मिसळताना पोलीस खात्याबद्दल आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण केला. त्याचाच परिणाम म्हणून पूर्वी फक्त दोन गावांत नक्षलवाद्यांना ‘गावबंदी’ असताना तांबे यांच्या प्रयत्नामुळे ६२ गावांनी गावबंदी केली. त्यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे तसेच त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्याने ५५ नक्षलवादी समर्थकांनी तांबे यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर आपली वाट चुकल्याची भावना निर्माण होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी १६ नक्षलवाद्यांनी तांबे यांच्या पुढाकाराने आत्मसमर्पण केले.
नक्षलवाद्यांना न जुमानता लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याच्या हेतूने तांबे यांनी विविध उपक्रम राबविले. त्याचाच एक भाग म्हणून जानेवारी २००८ मध्ये त्यांनी इटापल्ली येथे लोककला व क्रीडामहोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला स्थानिकांनी भरभरून प्रतिसाद देताना सुमारे अडीच हजार स्पर्धकांनी त्यात सहभाग घेतला होता. नक्षलवाद्यांवर पोलीस दलाचा दबाव वाढविण्यासाठी सवरेदय अभियान राबविले गेले. या अभियानाचे नियोजन, आखणी आणि कामगिरी तांबे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविली. त्यामुळे सवरेदय १ व २ असे अभियान पुढच्या टप्प्यात पोलीस दलाने राबविले. तीन महिन्यांपूर्वी इटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ पोलीस अधिकारी व कर्मचारी ठार झाले. अशा संवेदनशील परिस्थितीवर ताबा मिळविण्यासाठी तसेच नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मदतीने राज्यातील पोलिसांनी ‘ऑपरेशन पराक्रम’ मोहीम राबविली. या मोहिमेसाठी तांबे यांना सांगली येथून इटापल्ली येथे ‘स्पेशल डय़ुटी’ म्हणून बोलाविले होते. त्यांच्या या सर्व कामगिरीची दखल घेऊन राज्याच्या पोलीस महासंचालकांनी त्यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्याचा निर्णय घेतला. तांबे यांना मिळालेल्या सन्मानचिन्हाबद्दल पोलीस दलातून तसेच शिरूर तालुक्यातून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.