Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘विघ्न आणण्याचा प्रयत्न तान्हाजी बेनके यांनी थांबवावा’
नारायणगाव, १४ मे/वार्ताहर

शेतकरी विकास संघाचे कार्यक्षेत्र जुन्नर व आंबेगाव तालुका असताना संघाचे अध्यक्ष तान्हाजी बेनके हे फक्त श्री विघ्नहर कारखान्यावरच टीका, आरोप का करीत आहेत? आंबेगाव तालुक्यातील कारखान्यावर मोर्चा का काढत नाहीत? तेथील शेतकऱ्यांसाठी

 

आवाज का उठवित नाहीत? फक्त विघ्नहर कारखानाच शेतकरी संघाला दिसतो का, असे सवाल करून श्री विघ्नहर साखर कारखान्यावर वारंवार विघ्न आणण्याचा प्रयत्न बेनके यांनी थांबवावा, असा इशारा विघ्नहरचे अध्यक्ष सोपान शेरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर मोर्चा काढण्यासाठी तहसीलदार अथवा पोलिसांची परवानगी नसताना मोर्चा काढणाऱ्यांना शेतकरी विकास संघाचे अध्यक्ष तान्हाजी बेनके व आंदोलकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी शेरकर यांनी या वेळी केली.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात आज (दि.१४) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी शेरकर म्हणाले की, शेतकरी विकास संघाने जुन्नरचे तहसीलदार व पोलीस अधिकारी यांच्याकडे मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली होती; परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मोर्चाला परवानगी दिली नाही. परवानगी नसतानाही तान्हाजी बेनके व बाळासाहेब नलावडे यांच्या नेतृत्वाखाली विघ्नहर कारखान्यावर मोर्चा आणला, तसेच या मोर्चाबाबत कारखान्याला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना अथवा निवेदन दिले नाही.