Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

अनेकजणांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता प्रशासनात - तांबेळी
शिरूर, १४ मे / वार्ताहर

अनेकजणांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता प्रशासनात आहे. विकासाच्या योजना ज्या व्यक्तींकरिता निर्माण केल्या आहेत, त्या व्यक्तींपर्यंत या योजना प्रशासनाद्वारे पोहोचवायच्या व संबंधित व्यक्तीच्या आयष्यात हास्य फुलवायचे आहे, असे मत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्या डॉ. अय्याज तांबोळी यांनी शिरूर येथे

 

व्यक्त केले.
शिरूरच्या जीवन विद्या मिशनच्या केंद्राच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेले डॉ. तांबोळी व वैभव निंबाळकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम गुजर कॉलनीतील पटांगणात आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी शिरूरचे उपनगराध्यक्ष महेंद्र मल्लाव, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुकुमार बोरा, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग थोरात, प्राचार्य दादासाहेब मगर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष मेहबूब सय्यद, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, शिरूर नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचे सदस्य अॅड. प्रदीप बारवकर, डॉ. तांबोळी यांचे वडील फ. इ. तांबोळी, वैभव निंबाळकर यांचे वडील चंद्रकांत निंबाळकर, ॐ शांती केंद्राच्या अर्चना बहेनजी आदी उपस्थित होते.
तांबोळी म्हणाले की, जीवनात शिकलेल्या ज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर केला व यश मिळविले. दररोज वर्तमानपत्राचे वाचन करण्याच्या सवयीमुळे सामान्य ज्ञान व ग्रामीण व शहरी भागातील विविध प्रश्न याबाबतची माहिती समजली. वैद्यकीय काम करण्याऐवजी प्रशासनात जाण्याचा निर्णयाविषयी बोलताना तांबोळी म्हणाले की, डॉक्टर म्हणून काम करताना जिथे काम करणार होतो, त्या परिसरातीलच लोकांची रुग्णसेवा करू शकलो असतो. परंतु प्रशासनाच्या माध्यमातून अनेकजणांच्या आयुष्यात बदल घडविण्याची क्षमता प्रशासनात असल्याने प्रशासनात जाण्याचा निर्णय घेतला.
सिस्टीमला सिस्टीमच्या बाहेर राहून दोष देण्यापेक्षा प्रशासनात जाऊन योग्य पद्धतीने सिस्टीम चालविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तांबोळी म्हणाले. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हेच आपल्या यशाचे रहस्य आहे. असे सांगून तांबोळी यांनी शिरूरच्या लौकिकानुसार काम करू, अशी ग्वाही उपस्थित शिरूरकरांना दिली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविणारे वैभव निंबाळकर या वेळी म्हणाले की, सकारात्मक विचार,कामावर निष्ठा व प्रयत्न यामुळे यश संपादन केले. आयएएसमुळे स्वत:चे करियर घडविण्याबरोबर देशाचे करियर घडविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या पाल्यांना त्याच्या पालकांनी पूर्ण पाठबळ द्यावे, प्रोत्साहन द्यावे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करीत आहात, त्या क्षेत्रात सर्वोच्चस्थानी जाण्यासाठी धडपड करावी, असे आवाहन निंबाळकर यांनी उपस्थितांना केले.
चंद्रकांत निंबाळकर या वेळी म्हणाले की, मोठी स्वप्ने आपण पाहत नाही. जीवनात मोठी स्वप्ने पाहा व ही स्वप्ने पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करा. मुलांना यशासाठी प्रोत्साहन व प्रेरणा द्यावे, असेही निंबाळकर म्हणाले.
फ. इ. तांबोळी या वेळी म्हणाले, की कष्ट, जिद्द व सातत्यपूर्ण अभ्यास या जोरावर अय्याज तांबोळी यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविले.
या वेळी जीवन विद्या मिशनच्या अनेक नामधारकांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब ढोकळे यांनी केले. बाळासाहेब बिहानी, श्यामकांत वर्पे, भाऊ रासणे हे मान्यवरही या वेळी उपस्थित होते.