Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

राज्य

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठीचे ६५० कोटी रुपयेही ‘पाण्या’तच!
अभिमन्यू लोंढे, सावंतवाडी, १४ मे

सिंधुदुर्ग जिल्हा टँकरमुक्त झाल्याची घोषणा होऊनही पाण्यासाठी लोकांना दरवर्षी वणवण फिरावे लागत आहे. पाणी योजनांवर अंदाजे ६५० कोटी रुपये खर्चीही पडले, तरीही या हंगामात प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार ३१४ वाडय़ा तहानलेल्या आहेत. भूजल पातळीत घट झाल्याने या हंगामात मलमपट्टी करण्यासाठी खर्ची पडणारा निधी ठेकेदारांना जिवंत ठेवण्यातच उपयोगी ठरणार आहे. सुमारे १५० इंच पाऊस कोसळणाऱ्या सिंधुदुर्गात पाणीटंचाईसदृश स्थिती यावी, हेही एक नवलच ठरत आहे.

महाड तालुक्यात मोठी जंगलतोड
महाड, १४ मे/वार्ताहर

सामाजिक वनीकरण विभागाकडून तालुक्यात वृक्ष लागवडीची मोहीम सुरू करण्यात आली असताना तालुक्यातील काही भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर झाडे तोडली जात आहेत. प्रामुख्याने विन्हेरा, बिरवाडी या भागात मोठी जंगलतोड केली जात असताना, येथील वन विभागाकडून मात्र या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाड आणि पोलादपूर तालुका डोंगरदऱ्यांनी व्यापलेला प्रदेश आहे. घनदाट झाडी, उंच कडेकपारी, किल्ले रायगड, कांगोरीगडसारखी महत्त्वाची ठिकाणे या भागात आहेत. गेल्या १० वर्षांंपासून महाड आणि पोलादपूर तालुक्यात प्रचंड प्रमाणात झाडे तोडण्याचे उद्योग जंगल तस्करांकडून केले जात आहेत.

‘उलटा चोर कोतवाल कों डाटे’
म्हैसाळकरांचा ठाले पाटलांवर प्रतिहल्ला
नागपूर, १४ मे / प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ‘चोरांनी उलटय़ा बोंबा मारू नये’ असा टोला त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाला दिल्यावर संघानेही प्रतिहल्ला केला असून ‘उलटा चोर कोतवाल कों डाटे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. २६ एप्रिलला ‘लोकसत्ता’मध्ये पाटलांचा लेख प्रसिद्ध झाल्यावर त्याच दिवशी झालेल्या वि.सा. संघाच्या बैठकीत पाटलांच्या राजीनाम्याचा ठराव पुढे आला असला तरी ती लेखावरची प्रतिक्रिया नव्हती तर, तो पंधरा दिवसांपूर्वीच केलेल्या तयारीचा भाग होता, असा दावाही आता संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी एका पत्रकातून केला आहे.

मॉलमधील तीन लाखांच्या चोरीप्रकरणी असिस्टंट मॅनेजरला अटक
कल्याण, १४ मे / वार्ताहर
कल्याण पूर्व भागातील नेतिवली परिसरातील मेट्रो जंक्शन मॉलमधील द लूट या तयार करडय़ाच्या दुकानातील चोरी प्रकरणी असिस्टंट मॅनेजर गुरविंदरसिंग जसवंतसिंग संधू याला अटक करून ३, १२, ७३६ रुपये हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे.मेट्रो जंक्शन मॉलमध्ये द लूट नावाचे कपडय़ाचे दुकान आहे. या दुकानात संधू असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करीत होता. दर सोमवारी या मॉलमध्ये मिटिंग घेण्याचा प्रघात आहे.

अकोला व खामगावला वादळी पावसाचा तडाखा
दोन मोबाईल टॉवर व झाडे कोसळली
घरांची पडझड
वीज पुरवठा खंडित
अकोला / खामगाव, १४ मे / प्रतिनिधी / वार्ताहर
अकोला व खामगाव परिसराला बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा बसला. वादळामुळे काही गावांमध्ये घरांची पडझड झाली तसेच वीज पुरवठाही खंडित झाला. मोबाईलचे दोन टॉवर कोसळले.

शहरी भागातील वाढीव शासकीय भत्त्यांसाठी एमआयडीसी कार्यालयांचे महाडहून पनवेलला स्थलांतर
जयंत धुळप, अलिबाग, १४ मे

शहरी भागातील अधिक निवास भाडे भत्ता व अन्य शासकीय भत्ते पदरात पाडून घेण्यासाठी महाड बिरवाडी एमआयडीसी परिसरात असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे कोकण क्षेत्रीय कार्यालय आणि अधीक्षक अभियंता कार्यालय ही दोन कार्यालये नवीन पनवेल येथील खांदा कॉलनी येथे कोणत्याही सूचनेविना हलविण्यात आली आहेत़

पैशांसाठी पत्नीला जाळण्याचा प्रयत्न
संगमेश्वर, १४ मे/वार्ताहर

माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तगादा लावून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करीत तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याची घटना अंत्रवली मुस्लिम मोहल्ला येथे घडली. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी पती व सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इफ्तार हुसेन साटविलकर (२७) असे या विवाहितेचे नाव असून, ती ६० टक्के भाजली आहे. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात पती हुसेन साटविलकर (३२), सासरे इस्माईल साटविलकर आणि सासू बानू या तिघांनी माहेरहून पैसे आणण्यासाठी आपला मानसिक व शारीरिक छळ केल्याचे सांगितले. हुसेन याने आपल्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचे इफ्तारने स्पष्ट केले.