Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

निवडणुकीमुळे पाइपलाइनमधील झोपडय़ांना तूर्तास अभय?
ठाणे/प्रतिनिधी :
नगरसेवक बळीभाई नईबागकर?
अतिक्रमण विभागाचे उपायुक्त बी. जी. पवार? सहाय्यक आयुक्त मनिष जोशी?
निवडणुकीच्या रणधुमाळीत सरकारी यंत्रणा गुंतल्याचा फायदा उठवीत गांधीनगर भागात जलवाहिन्यांवरच झोपडय़ा बांधण्याच्या सुरू असलेल्या मोहिमेला सोमवापर्यंत अभय मिळणार असून, निवडणुकीचे काम संपताच त्या भुईसपाट करण्याची योजना पालिकेने आखली आहे. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाइपलाइनच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

निविदेच्या घोळात पाठय़पुस्तकांचा बट्टय़ाबोळ
ठाणे/ प्रतिनिधी

शाळांचे निकाल जाहीर झाले की, नवीन पाठय़पुस्तके घेण्यासाठी पालक व मुलांची धावपळ सुरू होते. यंदा अर्धा मे महिना संपत आला तरी, शालेय पुस्तके बाजारात न आल्याने पालक हैराण झाले आहेत. पाठय़पुस्तक महामंडळाकडून देण्यात येणारी पुस्तके तयार असून, ही पुस्तके मुख्य वितरकाकडून छोटे वितरक घेत असतात. मात्र मुख्य वितरकासाठी निविदा काढण्याचा हट्ट शिक्षण खात्याने धरल्याने दुकानदारांकडे पुस्तके पोहचू शकलेली नाहीत.

रोबो विथ सेन्स ऑफ टच
आता रोबो विज्ञान तंत्रज्ञान जगातील अविभाज्य घटक बनला आहे. काही माणसांच्या दैनंदिन जीवनातही त्यांचा वावर वाढला आहे. अनेक जण रोबोला आपला मित्र मानतात आणि त्याच्याशी आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी शेअर करतात, त्याच्याशी गप्पा मारतात. हे पटायला अवघड असले तरी अशाप्रकारचे जीवन परदेशात मोठय़ाप्रमाणावर जगले जात आहे. अनेक नोकरी करणारे पालक मुलांच्या विरंगुळ्यासाठी रोबो खरेदी करतात. त्यातूनच ‘ह्य़ुमॅनाइड’ म्हणजे माणसासारखे रोबो बनविण्याचे प्रमाण वाढत गेले. म्हणजेच आता या यंत्राला माणसाचा ‘लूक’ देण्यात आला आहे.

ओणनवसेतील सृजन-साक्षात्कार!
दापोली तालुक्यातील ओणनवसे गाव. दापोलीपासून सुमारे तीसेक कि.मी. आत वसलेलं. गाव तसं दुर्गमच. शहरी आधुनिकतेच्या वाऱ्यापासून काहीसं फटकून असलेलं. पंचक्रोशीतली गावंही साधारण याच वळणाची. अशा या दुर्गम खेडय़ांतल्या मुलांना संगीत, नाटय़, नृत्य, संगीत, वाद्यवादन, मलखांब आदी कला-क्रीडाप्रकारांशी जवळून परिचय त्यामुळे तसा दुरापास्तच. मात्र, दाभोळ खाडीलगत निसर्गाचा मनोरम सहवास लाभलेल्या श्री सातमाईदेवी विद्याप्रसारक संस्थेच्या सरस्वती माध्यमिक शाळेची मात्र इथल्या मुलांना बाहेरच्या आधुनिक जगाशी, तिथल्या जाणिवा प्रगल्भ करणाऱ्या गोष्टींशी परिचय करून देण्यासाठी अथक धडपड चाललेली.

डॉ. गो. मा. पवार यांना ‘दुर्गा भागवत शब्द पुरस्कार’ प्रदान
प्रतिनिधी

प्रसिद्ध लेखक-समीक्षक डॉ. गो. मा. पवार यांनी लिहिलेले ‘विनोद: तत्त्व आणि स्वरूप’ हे पुस्तक एवढे दर्जेदार आहे, की त्याचे भाषांतर केवळ भारतीय भाषेतच नाही; तर इंग्रजीतही व्हायला हवे. इंग्रजीतून आपण नेहमीच काही ना काही घेत आलोय, पण डॉ. पवार यांनी ‘विनोद: तत्त्व आणि स्वरूप’ या पुस्तकात विनोदाचा जेवढा सर्वागीण वेध घेतलाय, तेवढा इंग्रजीतही या विषयाचा विचार झालेला नाही, असे कौतुकोद्गार ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी बोरिवली येथे रविवारी पार पडलेल्या ‘दुर्गा भागवत शब्द पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात काढले.

‘कुणबी विकास महामंडळ ही निव्वळ धूळफेक’
ठाणे/ प्रतिनिधी

कुणबी आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेला विधिमंडळाने मंजुरी देऊनही ते प्रत्यक्षात येण्यासाठी तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यास विरोध केला. आता विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हे महामंडळ स्थापन करण्याची नव्याने केलेली सूचना म्हणजे लाखो कुणबी बांधवांच्या डोळ्यात केलेली धूळफेक असल्याच्या प्रतिक्रिया कुणबी समाजातून व्यक्त होत आहेत.

मॉलमधील चोरीप्रकरणी असि. मॅनेजरला अटक
कल्याण/वार्ताहर

कल्याण पूर्व भागातील नेतिवली परिसरातील मेट्रो जंक्शन मॉलमधील द लूट या तयार कपडय़ाच्या दुकानातील चोरीप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गवारे यांनी असिस्टंट मॅनेजर गुरविंदरसिंग संधू याला अटक केली. मेट्रो जंक्शन मॉलमध्ये ‘द लूट’ नावाचे कपडय़ाचे दुकान आहे. या दुकानात संधू असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करीत होता. दर सोमवारी या मॉलमध्ये मीटिंग घेण्याचा प्रघात आहे.

शिवसेना नगरसेवक नईबागकर यांचे भवितव्य आज ठरणार
ठाणे/प्रतिनिधी :
मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बळीराम नईबागकर यांना आयुक्तांनी उद्या सुनावणीसाठी पाचारण केले आहे. त्यामुळे त्यांच्या नगरसेवकपदाचा आज फैसला होईल. वर्तकनगर प्रभाग १९ मधून नईबागकर निवडून आले असून, तत्पूर्वी ते राष्ट्रवादीत होते. याच दरम्यान ते अध्यक्ष असलेल्या साईबाबा मंदिरात झालेले अनधिकृत बांधकाम आणि आपल्याच मुलाच्या नावे घेतलेले पालिकेचे कंत्राट, यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत तत्कालीन आयुक्त संजय सेठी यांनी २० मे २००६ रोजी नईबागकर यांना नोटीस बजावली होती. मात्र सुनावणीपूर्वीच त्यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविली होती. उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर २२ एप्रिल रोजी न्यायालयाने आदेश देताना आयुक्तांनी चार आठवडय़ांत निर्णय घ्यावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी नईबागकर यांना अंतिम सुनावणीसाठी उद्या आपल्या दालनात बोलावले आहे. त्यानंतर नईबागकर यांच्या नगरसेवकपदाचा निर्णय आयुक्त घेणार आहेत, त्यामुळे याबाबत आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

चिंचणी येथील आयटीआयचे स्नेहसंमेलन साजरे
ठाणे/प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांना कुशल कारागीर घडविण्याबरोबर त्यांच्या सर्वागीण विकासाकडे लक्ष देणाऱ्या सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून, या संस्थेला उज्ज्वल भवितव्य आहे, असे उद्गार चिंचणी येथील पंढरीनाथ तामोरे यांनी लक्ष्मण ज. राऊत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या वार्षिक स्नेहसंमेलनात काढले. संस्थेचे अध्यक्ष गजानन राऊत यांनी स्वागत केले. सहकार्यवाह हर्षवर्धन जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य बी. एम. शिंदे यांनी अहवाल सादर केला. प्रमुख अतिथी सिद्धार्थ पाटील यांनी कारगिल परिसराचा तेजस्वी इतिहास सादर केला. आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या वैशाली विजय पाटील आणि गुणवंत शिक्षक, विद्यार्थी यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी गटविकास अधिकारी दर्शना जाधव, सलाम सैनिक मोहिमेतील अभय दारूवाले व्यासपीठावर उपस्थित होते. स्वाती राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर सहकार्यवाह अशोक सावे यांनी आभारप्रदर्शन केले.

इंधनाचा पुरेपूर वापर करून सुखद आयुष्य जगा -जाधव
कल्याण / प्रतिनिधी

आयुष्याच्या उतारवयात आनंद, उत्साहाचे इंधन पुरेपूर वापरून सुखद आयुष्य जगायचे असते, सुखद क्षणांचा सुगंध जपायचा असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी सूर्यकांत जाधव यांनी नुकतेच येथे केले. ज्येष्ठ नागरिक संघ कल्याण आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्यातर्फे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. तरुणाई, प्रौढत्व, वृद्धत्व हा जीवनाचा क्रम आहे. तो त्या त्या टप्प्यावर उपभोगणे हेच जीवन आहे. हा जीवनपट जाधव यांनी आपल्या काव्यबोलीतून प्रेक्षकांसमोर मांडला. प्रत्येक कविता ही दोन पत्नींसारखी असते. एक लग्नाची, तर दुसरी मनातली. मनातल्या पत्नीला प्रत्येक जण निसर्गाच्या विविध रूपात शोधत असतो. आपल्या कविताही अशा तिचा शोध घेत असतात. दुसरीकडे आपण संसारात असतो. मुलेबाळे मोठी होतात, शाळेत जातात. हा उगवता इंद्रधनु आपण पाहत असतो. कवितांचे विविध प्रकार सादर करून जाधव यांनी रसिकांना खुलविले.

पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई -जऱ्हाड
ठाणे / प्रतिनिधी

पिण्याच्या पाण्यापासून जिल्ह्यातील कोणतेही टंचाईग्रस्त गाव, वाडी, वस्ती वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित शासकीय यंत्रणेने घ्यावी. त्यात थोडी जरी कुचराई झाली तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी ए. एल. जऱ्हाड यांनी दिला आहे. जिल्ह्यात विशेष ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या गंभीर बनत आहे. त्यासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत जऱ्हाड यांनी पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने काम करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार कामे सुरू आहेत. या कामांना अधिक गती द्या, पाणीपुरवठय़ाच्या कामात गैरप्रकार आढळल्यास कोणाचीही गय करणार नाही, असा इशाराही जऱ्हाड यांनी दिला.

राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा
डोंबिवली -
मोहिनीराज मासिकाच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त २० जून रोजी विशेषांक प्रसिद्ध केला जात आहे, म्हणून राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा घेण्यात येत असून, पाऊस हा विषय इच्छुकांनी ३० मेपूर्वी कविता पाठवायच्या आहेत. संपर्क - ९२२१७१८०२५.