Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

व्यक्तिवेध

रोक्झाना साबेरीची अखेर इराणच्या तुरुंगातून सुटका झाली. फेब्रुवारीमध्ये जेव्हा या ३१ वर्षीय अमेरिकन पत्रकार महिलेला इराणमध्ये अटक करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा जगभर एक भीतीचा शहारा उमटल्याशिवाय राहिला नव्हता. अमेरिका आणि इराण यांचे राजकीय वैमनस्य, एकूणच इस्लामी देशांचे आणि पाश्चात्य जगाचे व विशेषत: अमेरिकेचे बिघडत हिंसेच्या मार्गानेच चाललेले संबंध यांची भयावह प्रतिबिंबे रोक्झानासारख्या पत्रकारांच्या छळाच्या रूपाने जगासमोर येत असतात. पाकिस्तानात दहशतवाद्यांनी डॅनियल पर्लची केलेली हत्या जग अजून विसरलेले नाही. रोक्झाना साबेरीकडे अमेरिकन आणि इराणी असे दुहेरी नागरिकत्व आहे. तिचे वडील रझा साबेरी हे इराणी व आई अकिको ही जपानी. रोक्झानाचा जन्म इराणमध्ये झाला तरी ती वाढली

 

अमेरिकेत नॉर्थ डाकोटामध्ये. नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून पत्रकारितेत आणि केंब्रिजमधून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर १९९७मध्ये ती मिस नॉर्थ डाकोटा ही सौंदर्यस्पर्धासुद्धा जिंकली होती आणि १९९८मध्ये मिस अमेरिका सौंदर्यस्पर्धेत अंतिम फेरीतल्या दहाजणींमध्येही तिचा समावेश होता. पण पत्रकारिता हे रोक्झानाचे आवडते क्षेत्र. बीबीसी, तसेच अमेरिकेतल्या नॅशनल पब्लिक रेडिओसाठी ती मुक्त पत्रकार या नात्याने वार्ताकन करत असते. गेली सहा वर्षे आपल्या पुस्तकाच्या तयारीसाठी म्हणून ती इराणमध्ये वास्तव्य करून होती. जानेवारी महिन्यात तेहरानमध्ये वाइनची बाटली विकत घेतल्याच्या आरोपावरून तिला अटक करण्यात आली. इराणमध्ये मद्य विकणे-विकत घेणे बेकायदेशीर आहे, परंतु काळा बाजार सर्रास चालतो. प्रत्यक्षात तिच्या अटकेची बातमी जगाला कळली ती फेब्रुवारीत. मद्य विकत घेतल्याच्या साध्याशा आरोपाखााली अटक झाली असली तरी नंतर इराण पोलिसांनी तिच्यावर अधिकृत प्रेस कार्ड जवळ नसताना वार्ताहर म्हणून काम करत असल्याचा आरोप ठेवला आणि जेव्हा खटला उभा राहिला तेव्हा इराणच्या परराष्ट्र खात्यातर्फे चक्क अमेरिकेसाठी हेरगिरी करत असल्याच्या अतिशय गंभीर आरोपात तिला गोवले. रोक्झानच्या वकिलाला तिचा बचाव करण्याचा अवधीदेखील देण्यात आला नाही आणि इराणी न्यायालयाने तिला आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तिची रवानगी तेहरानच्या एव्हिन प्रिझनमध्ये करण्यात आली. जग हादरले ते तेव्हा. रोक्झानच्या आई-वडिलांनी इराणला धाव घेतली. दरम्यान रोक्झानानेही आपल्या या अन्याय्य तुरुंगवासाविरोधात बेमुदत उपोषण आरंभले. आई-वडील तुरुंगात भेटायला आले तेव्हा त्यांनी महत्प्रयासांनी तिला उपोषणापासून परावृत्त केले. अमेरिकेने आणि जगातील अनेक देशांनी या अटकेचा तीव्र निषेध केला. बराक ओबामा यांनी व्यक्तिश: तिच्या सुरक्षेविषयी काळजी व्यक्त केली. ओबामा नुकतेच अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते. रोक्झानाच्या अटकेचे प्रकरण हे ओबामांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांपुढच्या आव्हानांची एक चुणूक ठरू पहात होते. अमेरिकेत रोक्झान ज्या भागात राहते त्या नॉर्थ डाकोटा विभागातल्या फार्गो येथे गेल्या महिन्यात असंख्यजणांनी रोक्झानच्या सुटकेची कामना करीत त्या कामनेचे प्रतीक म्हणून झाडा-झाडावर पिवळ्या रिबिनी लटकावल्या होत्या. अखेर १० मे रोजी अपील कोर्ट पुन्हा भरविण्यात आले आणि बचाव पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. रोक्झानची आठ वर्षांची शिक्षा दोन वर्षांवर आणण्यात आली आणि ती र्पलंबित ठेवून रोक्झानला इराणबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. येत्या पाच वर्षांत रोक्झान कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात अडकली नाही तरच खऱ्या अर्थाने तिची या प्रलंबित शिक्षेतून मुक्तता झालेली असेल. सोमवारी, ११ मे रोजी रोक्झानला तुरुंगातून सोटण्यात आले तेव्हा डोळ्यात आनंदाश्रू घेऊन आई-वडील तिला घ्यायला तुरुंगाच्या दाराशी आले होते. तुरुंगाधिकाऱ्यांनी रोक्झानला तुरुंगाबाहेर काढले ते पत्रकारांच्या नजरेपासून दूर, मागच्या दाराने. ते काहीही असले तरी रोक्झानची सुटका झाली हे महत्त्वाचे आहे- आजच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीनेदेखील. व्हाइट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी रॉबर्ट गिब्ज यांनी ओबामा प्रशासनाच्या वतीने रोक्झाना साबेरीच्या अन्याय्य अटकेचा निषेध कायम ठेवीत इराण सरकारने दाखवलेल्या मानवतावादी दृष्टिकोनाचे- वेगळ्या शब्दात सांगायचे तर इराण सरकारला झालेल्या उपरतीचे - स्वागत केले आहे.