Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

अकोला, खामगावला वादळी पावसाचा तडाखा
अकोला / खामगाव, १४ मे / प्रतिनिधी / वार्ताहर

दोन मोबाईल टॉवर व झाडे कोसळली
घरांची पडझड ल्ल वीज पुरवठा खंडित
अकोला व खामगाव परिसराला बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा बसला. वादळामुळे काही गावांमध्ये घरांची पडझड झाली तसेच वीज पुरवठाही खंडित झाला. मोबाईलचे दोन टॉवर कोसळले.

निर्मलग्राम पुरस्काराची रक्कम आठ गावांना मिळालीच नाही
भंडारा, १४ मे / वार्ताहर

केंद्र शासनाच्या निर्मलग्राम पुरस्कार योजनेंतर्गत सन २००७-०८ करिता भंडारा जिल्ह्य़ातील ८ ग्रामपंचायतींची निवड झाली. मात्र, निवड केलेल्या या गावांना पुरस्काराची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. भंडारा तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवकांना ८ डिसेंबर २००८ रोजी पुणे येथे पुरस्कारासाठी बोलविण्यात आले; परंतु ४ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही पुरस्काराची रक्कम मिळाली नसल्याने सदर योजनेबाबत साशंकता व्यक्त केल्या जात आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शौचालयाचा उपयोग, परिसर स्वच्छता व पिण्याचे शुद्ध पाणी गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे या निकषावर पुरस्कार दिला जातो.

अडम वाटमारीतील आरोपी अडीच महिन्यानंतर जाळ्यात
कुही, १४ मे/ वार्ताहर

येथून १२ कि.मी. अंतरावरील अडम येथे अडीच महिन्यांपूर्वी घडलेल्या वाटमारीच्या गुन्ह्य़ातील चार आरोपींना पकडण्यात कुही पोलिसांना अखेर यश आले आहे. आरोपींना मोबाईल कंपनीच्या मदतीने पकडण्यात मदत झाल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. कुहीचे निरीक्षक कोळी यांनी घटनेच्या संदर्भात सांगितले की, १६ फेब्रुवारी रोजी रुयाड येथील श्रावण सेलोकर साळवा बाजार करून रात्रीच्या वेळी गावाला येत होते. अडम नजीक रस्त्यावर दोन मोटार सायकलवर स्वार असलेल्या चार तरुणांनी त्यांना पकडले व त्यांच्या जवळील ४० हजार रुपये रोख रक्कम, दागिने व नोकीया कंपनीचा ‘मोबाईल’ फोन हिसकावून घटनास्थळावरून पोबारा केला होता.

चंद्रपुरात जागतिक रेडक्रॉस दिवस
चंद्रपूर, १४ मे / प्रतिनिधी

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने जागतिक रेडक्रॉस दिवस येथील रेडक्रॉस भवनात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी एन.बी. वटी होते. चंद्रपूर जिल्हा रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. बी.एच. दाभेरे यांनी जागतिक रेडक्रॉस मुख्यालय जिनेव्हा येथून आलेले संदेश व घोषणांचे वाचन केले. हेन्री डय़ूनॉट यांच्या तैलचित्रास पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना वटी म्हणाले, सोसायटीचे जिल्हय़ातील कार्य अत्यंत बहुमोलाचे असून या कार्याचा ‘महाराणा ट्रॉफी’ देऊन राज्य शाखेने गौरव केलेला आहे.

१९ मे रोजी कळमेश्वरात विनायक तुमरामांचे व्याख्यान
कळमेश्वर, १४ मे / वार्ताहर

राष्ट्रसंत जन्मशताब्दी महोत्सवी वर्षांनिमित्त मंगळवारी १९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता संत लहानुजी महाराज सभागृहात डॉ. विनायक तुमराम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्यावतीने होणाऱ्या या कार्यक्रमात ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या दृष्टीत आजचे समाजकारण आणि आदिवासी समाज’ या विषयांवर डॉ. तुमराम पुष्प गुंफतील. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. मिलिंद जीवने यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी अमर रामटेके राहणार आहेत. बंडोपंत बोढेकर, सुनील नाथे या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

स्वच्छता अभियान कार्यशाळा रविवारी
कुही, १४ मे / वार्ताहर

नागपूर जिल्हा परिषद व राजस्व विभागाच्यावतीने संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीची कार्यशाळा रविवारी, १७ मे ०९ रोजी देशपांडे सभागृहात सकाळी ९वाजेपासून आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विविध शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती तज्ज्ञ मार्गदर्शक देणार आहेत. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.कार्यशाळा सकाळी ९ वाजेपासून सुरू होणार असून सायंकाळी ५.३० पर्यंत दोन सत्रात चालणार आहे. कुही तालुक्यातील आरोग्य, शिक्षण पंचायत, राजस्व व विभागातील सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी तसेच ग्रामपंचायत पदाधिऱ्यांनी, सदस्यांनी या कार्यशाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन संवर्ग विकास अधिकारी पुरुषोत्तम लुटे, गटशिक्षणाधिकारी पाठक, बालविकास प्रकल्प अधिकारी वानखेडे, पंचायत अधिकारी पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

सामूहिक सोहोळ्यात ४० जोडपी विवाहबद्ध
चिखली, १४ मे / वार्ताहर

येथील नागसेन बुद्ध विहारात विविधधर्मीय सामूहिक विवाह सोहोळा पार पडला. या सोहोळ्यात ४० जोडपी विवाहबद्ध झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामदास देव्हडे, तहसीलदार संजय खडसे व नागसेन बुद्धविहाराचे अध्यक्ष गुलाबराव मोरे, प्रा. राऊत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहोळ्यात आठ मुस्लिम, ३१ बौद्ध व एक मातंग जोडप्यांचा विवाह पार पडला. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम आलेल्या बिपीन इंगळे याचा सत्कार यावेळी करण्यात आला.
प्रा. अनंता आवटी यांचे सुयश चिखली येथील अनंता आवटी यांनी एम.फिलची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी ही पदवी प्राप्त केली आहे.

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी
गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघ
गडचिरोली, १४ मे / वार्ताहर

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी येथील इंदाळा गावानजिक असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत होणार आहे. यावेळी मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी एकाच वेळी सरू होईल, असे जिल्हा निडणूक अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आरमोरी, गडचिरोली, अहेरी, चिमूर, ब्रह्मपुरी आणि आमगाव या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १६ एप्रिला मतदान पार पडले. मतदार संघातील १२ लाख ८४ हजार ९२३ मतदारांपैकी ८ लाख ३५ हजार ९८९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६५.२१ एवढी आहे.
मतमोजणीच्या एकूण २२ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर सुरू राहणार आहे. मतमोजणीच्या कामासाठी ४३६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

वखार महामंडळाच्या गोदामात व्यवस्था
वर्धा लोकसभा मतदारसंघ
वर्धा, १४ मे/ प्रतिनिधी

वर्धा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी वखार मंडळाच्या गोदामात होणार असून मतमोजणी ८४ टेबलवर होणार आहे. सर्वाधिक २६ फेऱ्या धामणगाव विधानसभा मतदारसंघाच्या तर सर्वात कमी २० फेऱ्या वर्धा मतदारसंघाच्या होणार आहेत. मतमोजणीसाठी वर्धेतून काँग्रेसचे दत्ता मेघे यांच्याविरुद्ध भाजपचे सुरेश वाघमारे यांची मुख्य लढत असून बसपचे बिपीन कंगाले यांची ही दमदार उपस्थिती आहे. वर्धा मतदारसंघ आपला चेहरापालट करण्याच्या परंपरेची पुनरावृत्ती करणार काय? हा प्रश्न मतमोजणीच्या पाश्र्वभूमीवर औत्सुकतेचा ठरला आहे. मतमोजणी ही विधानसभा मतदारसंघातील फेरी निहाय होईल. धामणगाव -२६, आर्वी- २३, देवळी -२२, हिंगणघाट-२२, वर्धा-२०, मोर्शी -२१ अशा फेऱ्या होणार आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत गेडाम यांनी दिली. वर्धेसाठी एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ५४.७५ टक्के मतदारांनी मतदान केले. केंद्रीय व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यासमोर विधानसभा मतदारसंघ निहाय पर्यवेक्षकांची वेळेवर मोजणीसाठी निवड केली जाणार आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता
अकोला लोकसभा मतदारसंघ
अकोला, १४ मे/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून शनिवारी जाहीर होणाऱ्या निकालाची सर्वच राजकीय पक्षांमध्ये उत्सुकता आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब धाबेकर, भाजप-सेना युतीचे संजय धोत्रे, आणि भारिपबमंसचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात काटय़ाची लढत असून निकालानंतर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत निकाल घोषित होतील. खदान परिसरातील सरकारी गोदामांमध्ये निवडणूक विभागाने मतमोणी होणार आहे. ८४ टेबलांवर ही मतमोजणी केली जाणार असून यासाठी सुमारे २५० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदारसंघातील १४ लाख ८० हजार ६०६ मतदारांपैकी ७ लाख ८ हजार ३३८ कर्मचा-यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाविषयी मतदारांमध्ये असलेली अनास्था हेदेखील एक कारण मतदानाची टक्केवारी घसरण्यामागे असल्याचे बोलले जाते. अत्यंत कमी मतांच्या फरकाने विजयाची माळ कोणत्याही उमेदवाराच्या गळयात पडू शकते, अशी परिस्थिती या मतदारसंघात निर्माण झाली आहे.

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास कोठडी
कारंजा (घाडगे), १४ मे / वार्ताहर

ठाणेगाव येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा मुख्य आरोपी ईशाद रफीक अन्सारी याला तब्बल १७ दिवसांनंतर पकडण्यात कारंजा पोलिसांना यश आले आहे. बिहारमधील महुआ जिल्हा वैशाली येथून मुलीसह आरोपीलाही ताब्यात घेतले. ईशादला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून मुलीला वैद्यकीय तपासणीला वर्धेला पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात यापूर्वी मुख्य आरोपी ईशादचे वडील रफीक अन्सारी, आई शबरा खातून, ठाणेगावातील एक युवक मोहन नामदेव ठाकरे आणि सावळी खुर्द येथील मंगेश खवशी या चौघांना कारंजा पोलिसांनी अटक केली होती. त्यांना २९ एप्रिलला वर्धेला न्यायालयीन कोठडीत रवाना केले होते. २५ एप्रिलला ईशाद व मुलगी दोघेही मोटारसायकल क्रमांक एमएच-३१-३७४७ ने कारंजा परिसरातून पळून गेले होते. २७ एप्रिलला मुलीच्या आईने ईशाद, त्याचे आई-वडील आणि दोन युवक, असे पाच जणांविरुद्ध कारंजा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्याच दिवशी चार जणांना कारंजा पोलिसांनी अटक केली होती. पुणे येथे शोध घ्यायला गेलेले ठाणेदार डहाके यांना ईशादचा बिहारचा पत्ता मिळाला. तेथून त्याला अटक करण्यात आली.

सुनील तिजारे यांना विदर्भ पत्रकार मित्र पुरस्कार
बुलढाणा, १४ मे/ प्रतिनिधी

महाराष्ट्र शहर व ग्रामीण पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये दैनिक भास्करचे बुलढाणा प्रतिनिधी सुनील तिजारे यांची विदर्भ पत्रकार मित्र पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शोध पत्रकारितेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. गुरूवार २१ मे रोजी नागपूर येथील विदर्भ साहित्य संमेलन सभागृहात पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेखर अय्यर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार उमेश चौबे, तर प्रमुख पाहुणे म्हणून एस.एन. विनोद, पत्रकार सचिन काटे, महापौर माया इवनाते, अॅड. प्रशांत सत्यनाथ, आकाशवाणीचे अमर रामटेके, भीमराव बेले, रजनीकांत बोरले उपस्थित राहतील. गेल्या १५ वर्षांपासून पत्रकारितेचा वसा जपण्यात व शोध पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्यांना न्याय मिळवून देण्याऱ्यांचा गौरव करणे हा पुरस्काराचा उद्देश असतो. जिल्ह्य़ातील पुरस्कार विजेत्यांमध्ये पत्रकार विनोद फाटे (मोताळा), यांच्यासह समाजसेवेकरिता नागपुरातील अलका उटाळे, गजानन मुंडे, डॉ. नंदकुमार नहार, लक्ष्मण घुबे, शिवाजी मस्के, निलेशसिंग ठाकूर, इंद्रायणी जमदाडे यांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजी राजे जयंतीनिमित्त प्रहारतर्फे फळ वाटप
बुलढाणा, १४ मे / प्रतिनिधी

सामाजिक सेवेत अग्रेसर असलेल्या प्रहार संघटनेच्यावतीने छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक ममता शिशुगृहातील अनाथ बालकांना फळ व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. प्रहार संघटनेचे शहर प्रमुख संजय काळे यांच्या नेतृत्वाखाली आज, १४ मे रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाद्वारे प्रहारने एक आदर्श कार्यक्रम घेऊन चांगला पायंडा पाडला. या उपक्रमात प्रहारचे शहर प्रमुख संजय काळे, संतोष सोलपाकर, राजू अहीर, मुन्ना शर्मा, विजय अंभोरे, राजू निकम, शेख मुजाद्दीन, गजानन मुळे, मोहम्मद जिया, मो. राज, नितीन पैठणकर, गोविंद मोरे, राहुल जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ममता शिशुगृहाचे अधीक्षक दीपक मनवर, जाधव सिस्टर व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

कामयाब २००९मध्ये धनुर्विद्या व रायफल शुटींगचे प्रशिक्षण
बुलढाणा, १४ मे/ प्रतिनिधी

स्थानिक सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित २००९ या निवासी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात धनुर्विद्या व रायफल शुटींगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. डॉक्टर, इंजिनिअर सोबतच अनेकांना अभिनव बिंद्रा सारखे नेमबाज होण्याचे स्थान असते. त्याची ही स्वप्नपूर्ती होण्यासाठी ‘कामयाब २००९’ च्या शिबिरार्थीना धनुर्विद्या व रायफल शुटींगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणचा व ज्ञानाचा भविष्यामध्ये त्यांना निश्चितच फायदा होईल. धनुर्विद्या व रायफल शुटींगकरिता शाळेमध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून प्रत्येक शिबिरार्थीला धनुर्विद्या व रायफल शुटींगचे योग्य शास्त्रोक्त पद्धतीचे प्रशिक्षण देता येईल. संजय मुळे व मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरार्थी प्रशिक्षण घेत आहेत. धनुर्विद्या व रायफल शुटींग प्रशिक्षणामुळे शिबिरार्थीच्या आत्मविश्वासामध्ये कमालीचा बदल झाल्याचे जाणवते.