Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

विशेष लेख

फ्लू हा हजारएक वर्षांपासून अस्तित्वात आहे. प्रथमत: हा पक्ष्यांचा असणारा रोग नंतर इतर सर्व प्राण्यांत पसरला. प्रत्येक प्राण्यांचा ‘फ्लू व्हायरस’ वेगळा असतो. असे असले तरी त्याची लागण त्या त्या ठराविक प्राण्याव्यतिरिक्त इतर प्राण्यांनाही होऊ शकते आणि तो विषाणू या नव्या प्राण्याला आपली शिकार करू शकतो. उदा. घोडय़ाला ज्या विषाणूची लागण होऊन फ्लू होतो, तो विषाणू नंतर माणसातदेखील आढळला. त्याचप्रमाणे पक्ष्यांचा फ्लू व्हायरस इतर प्राण्यांमध्येही सापडला आहे.
एवढेच नव्हे तर दोन भिन्न फ्लू व्हायरस (प्राणी व माणसात असणारे) मिळून एक नवीनच विषाणू निर्माण करतात आणि हा नवा विषाणू पूर्वीच्या दोन विषाणूंपेक्षा जास्त शक्तिमान असू शकतो.
मेक्सिकोमध्ये १०० हून अधिक लोकांचा बळी घेणारा ‘स्वाइन व्हायरस’ हा डुक्कर,

 

पक्षी व माणसाच्या फ्लू व्हायरसच्या संयोगातून निर्माण झालेला आहे. हा ‘एव्हिअन फ्लू’ या व्हायरसपेक्षा कमी धोकादायक असला तरी त्याची संसर्ग पसरविण्याची क्षमता जास्त आहे, त्यामुळे त्याची लागण फार चटकन होऊ शकते. वास्तविक डुकरांमध्ये या व्हायरसची लागण अधूनमधून होत असते. या व्हायरसला H1N1 असे संबोधिले जाते. तसेच H1N2, H3N1 आणि H3N हेदेखील स्वाइन फ्लूने ग्रस्त रुग्णामध्ये आढळतात. २००७ साली WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन- जागतिक आरोग्य संघटना) च्या निरीक्षणामध्ये अमेरिका व स्पेन या शहरात लागण झाल्याचे लक्षात आले आणि तरुणांमध्ये या फ्लूचे प्रमाण जास्त आढळले.
स्वाइन फ्लूने आजारी पडलेला रुग्ण हा त्याची लक्षणे दिसण्याअगोदर एका दिवसापासूनच त्याचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरत असतो व नंतर सात दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस तो शिंकेद्वारे वा खोकल्यामार्फत या विषाणूचा प्रसार वातावरणात करतो.
स्वाइन फ्लूने आजारी असलेल्या रुग्णामध्ये खालील लक्षणे दिसतात.-
३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येतो. नाक गळणे, डोके दुखणे, अंग दुखणे, थंडी वाजणे, घसा दुखणे अशा तक्रारी तसेच फ्लूग्रस्त व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो. काहींना जुलाब व उलटय़ादेखील चालू होतात. अशात न्यूमोनियाचे प्रमाण कमी असले तरी काही रुग्ण त्याचीही लक्षणे दाखवितात.
लहान मुले जर अशांसारख्या लक्षणांनी आजारी वाटली आणि त्यांना श्वासोच्छवास करताना धाप लागत असेल, तसेच अंगावर लालसर पुरळ आले अथवा त्वचेचा रंग बदलून निळसर वाटत असेल तर फॅमिली डॉक्टरचा वा बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा लक्षणांमध्ये आजारी मूल पाणी प्यावयाचे नाकारते किंवा नेहमीपेक्षा पाणी कमी पिते. त्याच्या हालचाली मंदावून काही वेळा त्याला ग्लानी येते. चिडचिडेपणा येऊन मूल अंगाला हातदेखील लावू देत नाही. अशा वेळी ती किरकोळ बाब समजून हयगय करू नये.
मोठय़ा माणसांना दम लागल्यास, छातीत वा पोटात जड वाटून दुखल्यास, चक्कर आल्यास, सतत उलटय़ा-जुलाब झाल्यास, ग्लानी आल्यास ही स्वाइन फ्लूची लक्षणे असू शकतात. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सर्वसामान्यपणे फ्लूवर तयार असलेल्या लसी स्वाइन फ्लूसाठी जरी उपयोगी पडत नसल्या तरी नवीन लस बनविण्याचे काम संशोधक डॉक्टर जोरात करीत आहेत व त्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत, असे कळते. ओसेलॅटमिव्हीर आणि झ्ॉनॅमिव्हीरसारखी औषधे परिणामकारक आहेत.
डुकराचे मांस ७० अंश सेल्सिअसला उकळल्यास त्यातील स्वाइन फ्लूचे विषाणू मरतात. डुकराचे असे र्निजतुक केलेले मांस खाण्यास खात्रीलायक असू शकते. रोगप्रतिबंधक लस आज उपलब्ध नसली तरी हा फ्लू पसरू नये म्हणून आपण खालील काळजी घेणे जरुरीचे आहे-
खोकताना वा शिंकताना हात अथवा हातरुमाल नाकातोंडासमोर धरावा. रुमालाऐवजी टिश्यू पेपर वापरल्यास तो कचऱ्याच्या डब्यातच टाकावा.
नाकातोंडात बोटे घालण्याची सवय टाळावी.
हस्तांदोलनाऐवजी आपली भारतीय नमस्काराची पद्धत वापरावी.
फ्लूसारखी लक्षणे स्वत:मध्ये दिसून आल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. शक्यतो घरातच आराम करावा.
प्रकृती नीट राहण्यासाठी पुरेशी उत्तम झोप घ्यावी. द्रवपदार्थ भरपूर घ्यावे, सकस अन्न खावे, मनावरील ताण कमी करावे.
शरीराची चांगली स्वच्छता ठेवावी. हात स्वच्छ पाण्याने व साबणाने धुवावेत. साबण नसल्यास कमीत कमी २० सेकंद तरी हात स्वच्छ पाण्याने चोळून धुवावेत. जेल सॅनिटायझर किंवा अल्कोहोल मिश्रित टिश्यू पेपरचा उपयोग केला तरी चालेल.
साथ चालू असता फेस मास्क वापरावेत व गर्दीची ठिकाणे टाळावीत.
पाळीव डुकरे असल्यास व्हेटरनरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डुकरांची योग्य काळजी घ्यावी. फेस मास्क व हातमोजे यांचा वापर डुकरे हाताळताना न चुकता करावा.
मुंबई शहरात डुक्कर पाळणारे कमी असले तरी डुकराचे मांस खाणारे आहेतच. पाटर्य़ामधून डुकराच्या मांसाचे पदार्थ असतात. त्यांच्या कत्तलीवर कोणाचे नियंत्रण असते? मुंबईमध्ये स्वाइन फ्लूची लागण झालेली नाही, असे वृत्त मुंबई महानगरपालिकेने नुकतेच दिले आहे. मुंबई शहराच्या वेशीवर असणाऱ्या उपनगरांमध्ये मात्र डुकरे पाळली जातात. या गावांचा स्वाइन फ्लूच्या संदर्भात मागोवा व त्याबाबत सतर्क राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. मुंबईच्या विमानतळावर, रेल्वे स्थानकावर ज्याप्रमाणे रोगप्रतिबंधक पथक तैनात असते त्या पद्धतीची पथके या गावांमध्ये पाठविली गेली पाहिजेत. नगरपालिकेची इस्पितळे व दवाखान्यातील डॉक्टरांवर नवीन जबाबदारी टाकली गेली असेलच; परंतु सरकारने याबाबतीत योग्य ती यंत्रणा कार्यरत करणे जरुरीचे आहे.
वास्तविक फ्लूची साथ कोठे ना कोठे असतेच, मग त्याच्याबद्दल एवढा गदारोळ का? खरोखरच त्याच्यापासून जिवाला धोका आहे का? या भीतीमागचे कारण असे की माणसाचे एकंदर कामाचे तास साथीच्या रोगात कमी होतात, त्याचा परिणाम उत्पादकतेवर होऊ शकतो. कुटुंबाचे उत्पन्न कमी होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या साथीला योग्य त्या प्रतिबंधक उपायाने आटोक्यात ठेवण्याचे काम सरकारी यंत्रणेवर तसेच प्रशासनावर पडते. या संबंधीची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे हेदेखील महत्त्वाचे आहे. सामाजिक संस्थांनी देखील अशा वेळी आपल्या संघटनांना लोकप्रचारासाठी तयार करावे. किंबहुना अशा प्रकारचे एक कायमस्वरूपी मंडळ वेगवेगळ्या वॉर्डात लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयार असावे. तहान लागल्यावर विहीर खोदायला निघू नये.
डॉ. चंद्रकांत कांबळी