Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

विविध

‘स्माइली’च्या व्यावसायिक वापरासाठी पैसे मोजावे लागणार
मॉस्को, १४ मे/ पीटीआय

बऱ्याच जाहीरातींमध्ये दिसणारा नेटिझन्सचा आवडता ‘स्माइली’ आता सहज दिसणे बंद होणार आहे. कारण स्माइलीच्या व्यावसायिक वापरासाठी आता पैसे माजावे लागणार आहेत. रशियातील ‘सुपरफॉन’ कंपनीने स्माइलीचे स्वामीत्व विकत घेतले आहे.

बाल विवाहाच्या जाळ्यातून बाहेर पडलेल्या त्या ‘तिघी’!
नवी दिल्ली, १४ मे / पी.टी.आय.

बाल विवाहाच्या प्रथेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या तीन बालिकांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण अनुभवला.. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्य़ातील या तिन्ही बालिका एकेकाळी बालमजूर म्हणून काम करत होत्या.. आज त्या देशातील मुलींसाठी आदर्श ठरल्या आहेत.. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी झालेली भेट हा आयुष्यातील अविस्मरणीय ठेवा असल्याचे त्यांनी पी.टी.आय.शी बोलताना सांगितले.

‘स्लमडॉग मिलिऑनर’चे एवढे कौतुक कशासाठी?
फाळके पुरस्कारप्राप्त मृणाल सेन यांचा सवाल

नवी दिल्ली, १४ मे/पी.टी.आय.

ऑस्करविजेत्या ‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटात मुंबईच्या बकाल दुनियेचे खरेखुरे चित्र उमटल्याचा दावा ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांनी खोडून काढला असून ऑस्कर पुरस्कार हाच केवळ चांगल्या चित्रपटाचा निकष ठरू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झालेल्या मृणाल सेन यांचा आज ८७ वा वाढदिवस. या निमित्ताने पी.टी.आय. ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील भावना व्यक्त केली.

बिहारमध्ये मतदानाचा ‘टक्का’ का घसरला?
पाटणा, १४ मे/ पीटीआय

मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, राज्यघटनेने दिलेला हक्क बजवावा यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रसारमाध्यमांद्वारे झालेला प्रचार, त्यातून राजकीय पक्ष आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींनी काढलेले विविधांगी, परंतु नेहमीचेच परस्परविरोधी निष्कर्ष, राजकीय गरमागरमीपासून ते राजकारणातील गुन्हेगारीपर्यंतच्या मुद्दय़ावरील झडलेल्या चर्चा असा माहोल गेल्या काही महिन्यांपासून देशभरात व्यापून राहिला असला तरी बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टक्का का घसरला याचे नेमके उत्तर कोणालाही मिळालेले नाही. बिहारमध्ये अवघे ४३.७५ टक्के मतदान झाले आहे.

भारतावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या गटांचे उच्चाटन करा; अमेरिकेचा पाकिस्तानला सल्ला
वॉशिंग्टन, १४ मे/पी.टी.आय.
भारतावर सातत्याने दहशतवादी हल्ले करून अस्थिरता निर्माण करणाऱ्या पाकिस्तानातील दहशतवादी गटांचा पूर्णपणे बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशियाचे सहाय्यक मंत्री रिचर्ड बाऊचर यांनी व्यक्त केले. दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या पत्रकारांशी बोलताना बाऊचर बोलत होते. यावेळी, भारतामध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या पाकिस्तानमधील दहशतवादी गटांचे त्वरीत उच्चाटन करा , असा सल्ला त्यांनी पाकिस्तानला दिला.

निर्वासितांना घेऊन जाणारी बोट बुडून नऊ जणांना जलसमाधी
मियामी किनारा(फ्लोरिडा) १४ मे/ एपी

हैती देशातील निर्वासितांना घेऊन जाणारी एक बोट फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर बुडून किमान नऊ जणांना जलसमाधी मिळाली असल्याचे किनारा संरक्षकाने सांगितले. या दुर्घटनेतून १७ जणांना वाचवण्यात यश मिळाले असले तरी सुमारे ३० जण बुडले असावे, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तालिबानविरोधी मोहिमेला लवकरच यश मिळेल - गिलानी
इस्लामाबाद, १४ मे/पी.टी.आय.

तालिबान विरोधात पाकिस्तानी लष्कराने उघडलेल्या मोहीमेला लवकरच यश मिळेल, अशी हमी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी आज दिली. स्वात खोऱ्यात पाकिस्तानने तालिबान्यांविरोधात उघडलेली मोहीम न थांबविल्यास वायव्य सरहद्द प्रांतातील नेत्यांच्या कुटुंबियांना ठार करण्यात येईल, या तालिबान्यांच्या धमकीला भीक न घालता, या नेत्यांच्या सुरक्षिततेला महत्त्व देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

५४ तालिबानी व नऊ पाकिस्तानी सैनिक ठार
इस्लामाबाद, १४ मे/पीटीआय

तालिबानींच्या कब्जात असलेली स्वात खोऱ्याची राजधानी मिंगोरा या शहराला पाकिस्तानी लष्कराने वेढा दिला आहे. यावेळी सुरु असलेल्या चकमकीदरम्यान ५४ तालिबानी दहशतवादी व पाकिस्तानी लष्कराचे नऊ सैनिक ठार झाले.

दिल्लीला अधिक पाणी सोडण्याचा हरयाणाला आदेश
नवी दिल्ली, १४ मे/पी.टी.आय.

दिल्लीला पुरविण्याच्या पाण्याबाबत हरयाणा राज्य सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळत नसल्याबद्दल न्यायालयाने खंत व्यक्त केली असून राजधानीतील नंगलोई जलशुध्दीकरण प्रकल्पाला १२५ क्यूसेक्स पाणी तातडीने सोडण्याचा आदेश दिला. या प्रकरणावर पुढील सुनावणी १४ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून त्यावेळी न्यायालयात हरयाणाच्या मुख्य सचिवांनी उपस्थित रहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राच्या वडिलांना अटक
चंदिगढ, १४ मे/पीटीआय

बीजिंग ऑलिम्पिकदरम्यान नेमबाजीमध्ये सुवर्णपदक पटकाविणारा क्रीडापटू अभिनव बिंद्रा याचे वडील व अग्रगण्य उद्योगपती ए. एस. बिंद्रा यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली आज रात्री पोलिसांनी अटक केली. पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील झिकारपूर येथील ए. एस. बिंद्रा यांच्या फार्महाऊस येथून त्यांना दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. ब्रिंदा यांना आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार अ‍ॅपल फायनान्स व इंडसइंड बँकेने पोलिसांत दाखल केली होती. आर्थिक फसवणुकीची ही प्रकरणे २००६ व २००७ सालातील आहेत. अ‍ॅपल फायनान्स व इंडसइंड बँक यांना ४ कोटी ३१ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी बिंद्रा यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयाने गेल्या १० मे रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. बिंद्रा यांनी प्रकृती बिघडल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना चंदिगढच्या सेक्टर ३२ मधील रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. कर्जे फेडण्यास बिंद्रा यांनी टाळाटाळ केली तसेच त्यांनी दिलेले धनादेशही वटले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.