Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पांढरी पुलावरील दोन अपघातांत ४ ठार
सात वाहनांचे नुकसान
सोनई, १५ मे/वार्ताहर

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीच्या पुलावर आज २ वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार

 

झाले, तर ७ वाहनांचे नुकसान झाले. पहिला अपघात पहाटे ४ वाजता पुलावर अचानक थांबलेल्या मालमोटारीवर पाठीमागून येणारी दोन वाहने आदळून दोन चालक व एक प्रवासी असे तिघे ठार झाले. त्यानंतर सकाळी ९ वाजता झालेल्या दुसऱ्या अपघातात मालमोटारीची धडक बसून एकजणा ठार झाला.
पहिल्या अपघातासंदर्भात टिकाराम समरूपचंद शरणागत (वय २१, धंदा क्लिनर, रा. नागपूर) याने सोनई पोलिसांकडे फिर्याद दिली. आज पहाटे चार वाजता नगर-औरंगाबाद रस्त्यावर पांढरीपूल येथील मीरा भेळ सेंटरसमोर मालमोटार (एमएच २१ डी ९८९९) चालकाने अचानक थांबविली. पाठीमागून येणारी मालमोटार (एमएच ३१ सीबी ५८८) ही अचानक तिच्यावर आदळून उलटली. तसेच त्यानंतर येणारी मालमोटार (एमएच २० एटी २०६०) सुद्धा अचानक थांबलेल्या मालमोटारीवर आदळली. त्यात चालक दुर्गाप्रसाद (पूर्ण नाव माहीत नाही) हा जागीच ठार झाला. त्यातील प्रवासी प्रल्हाद आगलावे (परभणी) हा गंभीर जखमी झाला. उपचार घेत असताना रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. तसेच एमएच २० एटी २०६०चा चालक (पूर्ण नाव माहीत नाही) हासुद्धा या अपघातात ठार झाला. पहिल्या मालमोटारीच्या चालकाने अचानक वाहन थांबवून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल मालमोटार (क्रमांक ९८९९)च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक डी. एस. डंबाळे पुढील तपास करीत आहेत.
सकाळी ९ वाजता रस्त्यात उभ्या असलेल्या मिठूभाई शेख (खोसपुरी, ता. नगर) यास मालमोटारीने (एमएच २९ एम ३८४८) धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मिठूभाईचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात खंडू चिंधे यांनी फिर्याद
दिली.