Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मतमोजणीची जय्यत तयारी; दुपारी एकपर्यंत निकाल अपेक्षित
नगर, १५ मे/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील नगर व शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व कोण करणार हे गेले २२ दिवस बंद असलेले रहस्य उद्या (शनिवारी) खुले होईल. दुपारी एक वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे.
एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. शिर्डीची १ हजार ५७१, तर नगरची १ हजार ८७१ मतदान यंत्रे आहेत. त्यात २३ एप्रिलला एकूण ३२ (नगरचे १५ व शिर्डीचे १७) उमेदवारांचे भवितव्य बंद झाले आहे. सर्वाची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली आहे.

 

चर्चा, अंदाज, पक्की खात्री, पैजा यात २२ दिवस निघून गेले. उद्या सकाळी मतमोजणीच्या पहिल्या ३ ते ४ फेऱ्यानंतर ९च्या सुमारास या रहस्यावरचा पडदा उठेल.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी मतमोजणीच्या तयारीचा आज अंतिम आढावा घेतला. एका लोकसभा मतदारसंघासाठी ८४ टेबल (प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४) आहेत. त्यावर मतमोजणी अधिकारी, त्याला १ सहायक व १ शिपाई असे ३ कर्मचारी असतील. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जागेवर मतदान यंत्र आणून दिली जाणार आहेत.
प्रत्येक उमेदवाराला मतमोजणी प्रतिनिधी म्हणून ८५जणांची नियुक्ती करण्याचा अधिकार होता. प्रमुख उमेदवार वगळता बऱ्याच अपक्ष उमेदवारांना मतमोजणी प्रतिनिधीही नियुक्त करता आलेले नाहीत. काही प्रमुख उमेदवारांनी आपले जादा प्रतिनिधी या उमेदवारांच्या नावावर दिले असल्याची चर्चा आहे.
मतमोजणी या प्रतिनिधींच्या समक्ष केंद्रनिहाय होणार असली, तरी प्रतिनिधी व मतमोजणी कर्मचारी यांच्यात भक्कम जाळी असणार आहे. त्यामुळे कोणाही प्रतिनिधीला मतमोजणी प्रक्रियेत थेट हस्तक्षेप करता येणार नाही. त्यांनी मतमोजणी फक्त पहायची आहे. या प्रतिनिधींना सकाळी साडेसात वाजता मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाईल.
मतमोजणी कर्मचाऱ्यांना पहाटे ५ वाजताच केंद्रात उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व अन्य वरिष्ठ त्यापूर्वीच तिथे उपस्थित असतील. सकाळी ६ वाजता मतमोजणी कर्मचाऱ्यांना त्यांनी कोणत्या टेबलावर काम करायचे ते सांगण्यात येईल. प्रत्यक्ष मतमोजणी करणारे कर्मचारी ५०४ असले, तरी अन्य अधिकारी, कर्मचारी, शिपाई असे सर्व मिळून किमान बाराशेजण सरकारी कर्मचारी म्हणून केंद्रात असतील.
नगरच्या २५ व शिर्डीच्या २१ फेऱ्या होतील. प्रत्येक फेरीची आकडेवारी फेरी संपली की लगेच जाहीर केली जाईल. त्याचवेळी ही फेरीनिहाय आकडेवारी थेट दिल्लीला निवडणूक आयोगालाही पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी मतमोजणी केंद्रात विशेष संगणक कक्ष तयार करण्यात आला आहे.