Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

शेलार यांचे उपोषण मागे
नगर, १५ मे/प्रतिनिधी

पिंपळगाव जोगे धरणातून दि. २०ला कुकडीचे आवर्तन सोडण्याचे आश्वासन पाटबंधारे

 

मंत्री रामराजे निंबाळकर यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी चार दिवसांपासून सुरू केलेले उपोषण मागे घेतले.
उपोषणामुळे श्री. शेलार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तथापि, कुकडीचे आवर्तन सोडण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर सायंकाळी शेलार यांनी कर्जतचे प्रांताधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषण सोडले.
पिंपळगाव जोगे धरणातून येडगावमध्ये पाणी सोडून कुकडीचे आवर्तन सोडावे, या मागणीसाठी श्रीगोंदे येथे शेलारांनी उपोषण सुरू केले होते. गेले तीन दिवस कुकडीच्या आवर्तनाबाबत निर्णय होऊ शकला नाही. मात्र, आज पाटबंधारे राज्यमंत्री निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक झाली. त्यात कुकडीचे आवर्तन दि. २०पासून सोडण्याचे निंबाळकर यांनी मान्य केले. याबाबतची माहिती त्यांनी आपल्याला मोबाईलवर देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानुसार आपण उपोषण मागे घेतल्याचे शेलार यांनी सांगितले. उपोषण सुटावे, यासाठी जलसंपदामंत्री अजित पवार, वनमंत्री बबनराव पाचपुते, कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष वल्लभ बेणके यांच्याशी चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
या वेळी श्रीगोंदे येथील कार्यकर्ते राजाराम जठार, भाऊसाहेब गलांडे, सतीश जामदार, विजय गवळी, संग्राम देशमुख, अजय देशमुख आदी उपस्थित होते.