Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

घाईने होतो घात..
अगदी सकाळी सकाळी क ोणतंही वृत्तपत्र उघडलं की अपघाताच्या बातम्या हमखास वाचायला मिळतात. दूरचित्रवाणीवर बातम्यांचं क ोणतंही चॅनेल लावलं की फूटलाईनवर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्याच बातम्या झळकत असतात.
कामाच्या निमित्ताने वर्षांतले ८ ते १० महिने रस्त्यावरच म्हणजे प्रवासात मी असते. त्यामुळे अपघाताची आणि अपघात घडून गेल्यानंतरची दृश्यं मला सततच पाहावी लागतात.

 

सायकल, मोटरसायकल, मोठमोठे कंटेनर अशा सर्व प्रकारच्या वाहनांचे टकराव पुष्कळदा डोळ्यांदेखत घडलेत. प्रत्येक वेळी मला अपघातात छिन्न-विछिन्न झालेल्यांच्या घरच्या-आसपासच्या माणसांचे आकांत नजरेसमोर येत राहतात.
या अपघातांपायी घरच्या घरं उद्ध्वस्त झालेली मी पाहिली आहेत. या अपघातांमागे नशीब किंवा नियतीचा भाग किती आणि जबाबदारीचं भान विसरत चाललेल्या माणसांचा वाटा किती याचा शोध घेणं आवश्यक आहे.
अगदी परवाच समोरून चारचाकी गाडी आली. २०-२२ वर्षांचा ड्रायव्हर. गाडीत महिला, लहान मूलं. आमच्या गाडीच्या ड्रायव्हरनं लाईट देऊनही हा ड्रायव्हर गाडीला भिडला. भिडतानाच खिशातून मोबाईल काढत ड्रायव्हरला म्हणाला, ‘काय रे, कधीपासून गाडी चालवतो? थांब तुला दाखवतो.’ असं म्हणत असतानाच एकीकडे तो जोरजोरात मोबाईलची बटन दाबत होता. चूक क ोणाची? हा करतो काय? म्हणतो काय? बहुधा गाडीचा मालक क ोणी बडा साहेब असावा.
नंतर अगदी तासानंतरच एका मोठय़ा कार्यालयाच्या आवाराच्या फाटकातून एक कार वेगानं बाहेर पडली. डाव्या बाजूनं त्यापेक्षा अधिक वेगानं सुमो आली. अगदी समोरच उभी आडवी जोरदार टक्कर. कारचालकाचं नाक, कपाळ फुटून रक्ताच्या धारा सुरू झाल्या. सुमोवालेही आतल्या आत गच्चून धडकले. पलीकडे वाहतूक पोलीस शांतपणे बघत उभे होते. गर्दी वाढल्यावर तेही पुढे आले. अर्थात आधी येऊन ते तरी काय करणार होते? अपघातांची अशी कितीतरी वर्णनं, आठवणी सांगता येतील. पण त्यानं काय साधणार आहे?
दिवसा होणारे अपघात असे समोरासमोर अथवा मागच्या बाजूनं गाडय़ा धडकून होतात. पहाटेच्या वेळेला किंवा मध्यरात्री जास्त अपघात होतात. बहुतेक अपघातांमध्ये ‘घाई’ हा कॉमन फॅक्टर असतो. ही कुठली घाई असते? अलीकडे मोबाईलवर बोलत वाहन चालवणं, ड्रायव्हरसह गाडीत गप्पांचा फड रंगवणं किंवा प्रवाशांच्या गप्पांमध्ये ड्रायव्हरनं नको इतका रस घेणं, शायनिंगसाठी कट मारणं, ओव्हरटेक करणं अशा गोष्टी घडताना दिसतात. सूचना देणारे, अपघातांच्या परिणामाविषयी काही सांगणारे फलक मोठमोठय़ा अक्षरात जागोजागी लावलेले असतात. निरक्षर ड्रायव्हरनं ते वाचण्याचा प्रश्नच येत नाही. साक्षर ड्रायव्हर्सना गाडीच्या वेगात ते दिसत नाहीत.
लग्नसराई, दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवास करीत असलेल्या, देवदर्शनाला चाललेल्या किंवा देवदर्शन क रून परत निघालेल्या गाडय़ांच्या अपघातांची संख्याही खूप अधिक आहे. या गाडय़ा कधी स्वतच्या, तर कधी भाडेतत्त्वावर घेतलेल्या असतात. साऱ्यांना वेळ गाठायची असते. आरतीची, महाप्रसादाची, कधी गाडी आणि माणसं विशिष्ट वेळात विशिष्ट ठिकाणी पोहोचवायची असतात. काही भक्त तर किती कमी वेळात किती तीर्थस्थळांचं दर्शन घेतलं, आरती प्रसादाची वेळ कशी कौशल्यानं साधली, त्यासाठी ड्रायव्हरला काय प्रलोभनं दाखवली यांच्या सुरस गोष्टीही सांगत असतात. त्याच्या जोडीनंच त्यांच्या मागच्या किंवा पुढच्या गाडय़ांच्या अपघाताचे किस्सेही ऐकवतात.
पहाटे निघालेल्या ड्रायव्हरची पुरेशी झोप झालेली आहे का याची कितीजणांना माहिती असते? देवांना दिवसभर नारळ, नैवेद्य, अभिषेक करून रात्री परत निघताना ड्रायव्हरच्या विश्रांतीचा, झोपेचा विचार आपण किती करतो? अलीकडे नव्या गाडय़ांच्या भरपूर वेगमर्यादांमुळे तरुण मालक-चालकांमध्ये अमुक वेळात अमुक ठिकाणी पोहोचलो असं सांगण्याची फॅशन रूढ होते आहे. ‘अरे, पुण्याला पोहोचायला अडीच तास! गेल्या आठवडय़ात मी पावणेदोन तासात पुण्यात टच झालो’, असं म्हटलं जातं. प्रवाशांच्या सोयीसाठी, वेळ वाचवण्यासाठी बनवलेले चौपदरी, सहापदरी रस्ते, एक्स्प्रेस हायवे हे तर भरपूर टोल घेऊन वाजवल्या जाणाऱ्या मृत्यूघंटाच झाल्या आहेत. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध आता कडक नियम केले आहेत. पण नियम पाळण्यापेक्षा ते मोडण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतातच. त्याच्याही पराक्रमाच्या गाथा ऐकवल्या जातात.
‘मी बरोबर नियमानं गाडी चालवत होतो, पण समोरून, बाजूनं, मागून येऊन धडकला. चूक त्याची मी काय क रू?’ याचं उत्तर क ोणाकडेच नसतं. मुळात अपघात घडून गेल्यानंतर हात, पाय, जीव यातलं काहीही गेल्यानंतर कोण चूक, क ोण बरोबर या साऱ्याच गोष्टी निर्थक होऊन जातात. कोणताही अपराध नसताना जीव गमावलेले, आयुष्यभराचं अपंगत्व सोबतीला आलेले आणि हे सारं नजरेसमोर पाहणारे आणि त्यानंतरच्या परिस्थितीनं आयुष्यभर होरपळत राहणारे असंख्य लोक यांना या चूक-बरोबरच्या हिशेबाशी काय देणं-घेणं? पैशानं केलेली भरपाई माणूस परत देते की हात, पाय, मेंदू, कणा? यातलं काहीच नाही.
अपघाताची उदाहरणं, कारणं अनेक सांगता येतील. अपघातग्रस्तांच्या कुटुंबाची वाताहत तर आपल्या अवतीभोवतीच दिसते. हे सारं सांगण्यानं अपघात कमी होणार आहेत का? मुख्य मुद्दा आहे अपघात घडू नयेत, यासाठी आपण स्वत किती दक्ष आहोत?
तर अजिबातच नाही. सततच अपघाताविषयीच्या विचारांची टांगती तलवार मनावर ठेवून प्रवास करायचा असं नाही. पण प्रवासादरम्यान, प्रवासाआधी काही गोष्टींची खबरदारी आपण घेऊ शकतो. ज्यात वेळेचं नियोजन, ड्रायव्हरविषयी पुरेशी माहिती अगदी नेहमीचा असला तरी, बदली ड्रायव्हरविषयी तर अधिक काळजी घेणं आवश्यक असतं. कारण त्याच्या आधीच्या ट्रिपा, सवयी या गोष्टींची आपल्याला काहीच माहिती नसते.
ड्रायव्हरजवळच्या लायसन्स, कागदपत्रं अशा कागदांची तपासणी, आवश्यक ती कागदपत्रं नसली, तर अनेकदा पोलिसांना पाहिलं की ड्रायव्हर गाडी वेगानं पळवायला सुरुवात करतात. रस्त्याशी, इतर वाहनांशी ड्रायव्हरला छेडछाड न क रू देणं, गाडीचा वेग, मोबाईलचा वापर याविषयी ड्रायव्हरला योग्य पद्धतीनं पण ठामपणे सूचना देणं, आवश्यकता असेल तरच रात्रीचा प्रवास करणं किंवा ड्रायव्हरच्या पद्धतीनं त्यासंबंधी निर्णय घेणं, डुलक्या घेणाऱ्या माणसानं ड्रायव्हरशेजारी न बसणं, ड्रायव्हर हा पगारी नोकर असला, तरी काही काळ गाडी हेच आपलं घर बनलेलं असल्याकारणानं ड्रायव्हरशी घरच्या माणसासारखंच वागणं, त्याच्याही जेवणा-खाण्याच्या वेळा सांभाळणं अशा बारीक-सारीक गोष्टी आपल्याला सहजपणे करता येणं शक्य आहे. हे सारं अलीकडे मीच मला सांगायला लागलेय
आणि वेळ सांगून येत नाही हे खरं असलं तरी वेळ, काळाचं थोडंसं भान बाळगायला काय हरकत आहे?