Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पाणीप्रश्नी सोमवारपासून
प्रभाग समितीनिहाय बैठका
नगर, १५ मे/प्रतिनिधी

शहर पाणीपुरवठय़ातील अडचणींची माहिती घेण्यासाठी मनपा आयुक्त कल्याण केळकर

 

सोमवार (दि. १८)पासून प्रभाग समितीनिहाय बैठका घेणार आहेत. प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागांच्या नगरसेवकांना बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे.
मनपाच्या चार प्रभाग समित्यांच्या दि. १८, १९, २० व २१ अशा चार दिवस बैठका होतील. आयुक्तांनी शहरांतर्गत पाणी वितरण व्यवस्थेवर आता लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली असून, या बैठका त्याचाच भाग आहे.
चारही प्रभाग समित्या आता व्यवस्थित कार्यरत झाल्या आहेत. आयुक्तांनी बोलावलेल्या प्रभाग समितीच्या बैठकीत पाणीपुरवठा हा प्रमुख विषय असला, तरी समित्यांच्या कामकाजाच्या अनुषंगाने अन्य काही विषयांचीही चर्चा होईल. शहरांतर्गत पाणी वितरण व्यवस्थेतील गोंधळामुळे सध्या नागरिक हैराण झाले आहेत. यात नक्की समस्या काय आहे हे जाणून घेण्यासाठीच आयुक्तांनी या बैठकांचे आयोजन केले असून, त्यात नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील पाण्याच्या अडचणींविषयी बोलण्यास सांगण्यात येईल. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम, तसेच या विभागाचे त्या-त्या समित्यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारीही बैठकीला उपस्थित असतील. नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागांची पाणी समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यावरच्या उपायांबाबतही चर्चा होईल. जलवाहिनी बदलणे, पाणी सोडण्याच्या वेळांमध्ये बदल यासारख्या उपायांची नोंद करून घेऊन त्यावर लगेच काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात येतील. त्यासाठीच्या निधीचीही तरतूद करण्यात येणार आहे. या बैठकांच्या निमित्ताने प्रभाग समित्यांना कामकाजाची घडी घालून देण्याचा आयुक्तांचा प्रयत्न असल्याचे समजते. ही घडी बसली की त्यानंतर प्रभाग समित्यांवरील अशासकीय सदस्यांच्या (नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था, संघटना यांचे ३ सदस्य) नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.