Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

कुकडीचे आवर्तन अखेर २० मेपासून
पुण्याच्या बैठकीत निर्णय
श्रीगोंदे, १५ मे/वार्ताहर

कुकडीच्या पाण्यासाठी तालुक्यात सुरू असलेला नेते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा संघर्ष अखेर आज संपला. कुकडीतून येत्या २०मेपासून आवर्तन सोडण्याचा निर्णय पुण्यातील बैठकीत

 

झाल्याने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार यांचे उपोषण सुटले. शेलारांची झुंज, कुंडलिकराव जगतापांचा संघर्ष व वनमंत्री बबनराव पाचपुते यांचे प्रयत्न या त्रिवेणी संगमाचा परिपाक आवर्तन सोडण्यास कारणीभूत असला, तरी शेलारांच्या उपोषणाचा रेटा वस्तुस्थितीची जाणीव करून देणारा ठरल्याने हा निर्णय सरकारला घ्यावा लागला.
कुकडीच्या दुसऱ्या आवर्तनासाठी गेल्या आठ दिवसांपासून तालुका व विशेष करून कुकडी लाभक्षेत्रातील परिसर संघर्ष करीत आहे. शेतात ऊस, भुईमूग, लिंबासह इतर फळबागा मोठय़ा क्षेत्रांवर असतानाच जनावरांसाठी लागणारी पिकेही अडचणीत आली होती. पाटबंधारे विभागाने दोन पाण्याचे नियोजन केले होते. मात्र, पहिल्या आवर्तनात अतिरिक्त पाणी सोडल्याने दुसऱ्या आवर्तनाला पुरेसे पाणी येडगाव धरणात शिल्लक राहिले नाही. त्याच वेळी दुसरे आवर्तन सुटणे अडचणीचे वाटू लागले. २ मे रोजी शेलार यांनी आवर्तनासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेऊन ११ला रस्त्यावर उतरण्याचे जाहीर केले. त्याच दरम्यान कुकडी कारखान्याचे अध्यक्ष जगताप यांनीही आवर्तनासाठी संघर्षांची भूमिका घेऊन ८ मे रोजी रस्त्यावर येण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, या आंदोलनात वनमंत्री पाचपुते यांनी शिष्टमंडळासह कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष वल्लभ बेणके यांची भेट घेऊन ११ला आवर्तन सोडण्याबाबत निर्णय घेतला. मात्र, पाण्याबाबत आश्वासक माहिती न मिळाल्याने शेलार-जगताप यांची दोन आंदोलने स्वतंत्रपणे झाली.
याच संघर्षांत ११ला आवर्तन सुटलेच नाही व शेलारांनी याप्रश्नी उपोषण सुरू करून संघर्ष सुरू केला. त्याच वेळी डिंबेतून येडगावला पाणी जाणारा कालवा फुटला व पाण्याबाबतची अनिश्चितता वाढल्याने सगळेच अस्वस्थ झाले. उपोषणार्थी शेलारही रुग्णालयात दाखल झाले. मुंबई-पुण्यातील आवर्तनाबाबतच्या बैठका निर्णयाविना पुढे ढकलल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, अशी स्थिती वाटू लागली. मात्र, अखेर न्याय मिळून आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला.
हा निर्णय करण्यास भाग पाडण्यात शेलार यांची भूमिका महत्त्वाची असली, तरी जगताप, पाटपाणी परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्या आंदोलनाचा रेटा, वनमंत्री पाचपुते यांनी मुंबईत केलेले जोरदार प्रयत्न यामुळे हा निर्णय झाला. आता या निर्णयाचे राजकारण करून घेण्यासाठी भांडण्यापेक्षा हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे आवश्यक
आहे.
पाचपुते खूश-जगताप नाखूश!
पाणी सोडण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना वनमंत्री पाचपुते म्हणाले की, प्रयत्नांची पराकाष्टा करून हा निर्णय घेण्यास नेत्यांना राजी करावे लागते. अधिकाऱ्यांना पटवून देऊन केवळ तालुक्यातील पिके व पर्यायाने शेतकरी वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नात आता श्रेयासाठी कुणीही धडपड करू नये. लोकांना कुणामुळे पाणी सुटले हे माहीत आहे. जगताप म्हणाले की, पाणी तालुक्यात येण्यासाठी आठ-दहा दिवस लागतील. तोपर्यंत पिके वाचणार नाहीत. हा निर्णय केवळ पुणेकरांचे हित डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. हा नादी लावण्याचा प्रयत्न असून, आम्ही पुणेकरांच्या अशा राजकारणाचा निषेध करतो.