Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

व्यापाऱ्याची चारलाख ठेवलेली बॅग लांबविली
राहाता, १५ मे/वार्ताहर

अहमदाबाद येथील व्यापाऱ्याची शिर्डी ते मनमाड प्रवासादरम्यान ३ लाख ९५ हजार

 

रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोरीस गेली. मनमाड पोलिसांनी फिर्याद घेण्यास नकार दिल्याने या व्यापाऱ्याने अखेर येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार शिर्डी पोलिसांनी दोन जीपचालकांविरुद्ध आज चोरीचा गुन्हा दाखल केला.
पोपटलाल साखरचंद पटेल (वय ४५) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचा अहमदाबाद येथे इलेक्ट्रीक वस्तूंचा व्यवसाय असून, ते नगर जिल्ह्य़ातील व्यावसायिकांना साहित्य पुरवितात. या साहित्याची असलेली उधारीची रक्कम ३ लाख ९५ हजार रुपये त्यांनी वसूल क रून बॅगमध्ये ठेवली होती. पटेल हे शिर्डी येथून मनमाडकडे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमध्ये (एमएच २० एए १२२८) चालले होते. मनमाडला उतरल्यानंतर रोख रक्कम असलेली बॅग चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जीपचालकांकडे बॅगची चौकशी केली. परंतु त्यांनी बॅग चोरल्याचा इन्कार केला. तुम्ही शोध घ्या तोपर्यंत थांबतो, असे सांगत नंतर बऱ्याच वेळाने चालक जीप घेऊन शिर्डीला आला. पटेल यांनी मनमाड पोलीस ठाण्यात खबर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुम्ही शिर्डी येथून आलात व घटना तेथेच घडली असावी, असे उत्तर देत फिर्याद घेण्यास नकार दिला.
पटेल हे शिर्डीला आले. त्यांनी येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली. न्यायालयाच्या आदेशावरून शिर्डी पोलिसांनी विजयकुमार आनंदराव सोनवणे (दाभाडेवस्ती, शिर्डी) व रघुनाथ वाणी (नांदुर्खी) या दोघा जीपचालकांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींना अद्यापि अटक करण्यात आलेली नाही. पटेल यांच्या पैशाची बॅगची चोरी मनमाड येथे झाली असावी. या घटनेमुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचालकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.