Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

१८७ निर्मलग्रामांना पुरस्कारापोटी २ कोटी २३ लाख
स्वच्छतेत सातत्य न राखल्यास रक्कम परत!
नगर, १५ मे/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील निर्मलग्राम पुरस्कार मिळवलेल्या १८७ ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कारापोटी २ कोटी २३ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. यातील ८ ग्रामपंचायतींना पुरस्कारातील

 

काही टक्केच निधी मिळणार आहे. त्यांनी सहा महिने स्वच्छतेबाबत सातत्य ठेवल्यास त्यांना पुरस्काराची उर्वरित रक्कम दिली जाईल; अन्यथा दिलेली रक्कम परत घेण्यात येईल.
पुरस्काराचा निधी जिल्हा परिषद पातळीवर प्राप्त झाला असून, आचारसंहिता संपल्यावर ग्रामपंचायतींना तो वितरित केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव करपे यांनी दिली.

निर्मलग्राम पुरस्कारासाठी गेल्या वर्षी जिल्ह्य़ातील १८७ गावांची तपासणी झाली. संबंधित सरपंच व ग्रामसेवकांना राष्ट्रपतींच्या हस्ते ८ डिसेंबर २००८ रोजी समारंभापूर्वक पुणे येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले. मात्र, पुरस्काराची रक्कम ग्रामपंचायतींना देण्यात केंद्र सरकारकडून उशीर झाला. ती आता लवकरच मिळेल.
पुरस्काराची रक्कम लोकसंख्येनुसार दिली जाते. यंदाच्या पुरस्कारप्राप्त १८७ पैकी ४८ ग्रामपंचायती १ हजार लोकसंख्येच्या मर्यादेत होत्या. त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये, २ हजापर्यंत लोकसंख्या असलेल्या ८१ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १ लाख, ५ हजापर्यंत लोकसंख्येच्या ५० ग्रामपंचायतींना प्रत्येकी २ लाख मिळतील.
१० हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ४ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ४ लाख रुपये मिळतील. मात्र, त्यांना आता प्रत्येकी २ लाखच मिळतील. १० हजारांपुढे लोकसंख्या असलेल्या ४ ग्रामपंचायतींना ५ लाखांपैकी निम्मीच रक्कम मिळेल.
केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार मोठय़ा लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना स्वच्छता अभियानात सातत्य ठेवले की नाही, याची खातरजमा सहा महिन्यांनी केली जाईल. सातत्य आढळले, तर उर्वरित रक्कम मिळेल; अन्यथा पुरस्काराची रक्कम जाहीररित्या परत घेतली जाईल.