Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

बायजाबाई सोसायटीत पाच लाखांची घरफोडी
नगर, १५ मे/प्रतिनिधी

बंद खोलीचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व रोख रक्कम असा सुमोर पाच

 

लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. ही चोरी आज पहाटे पाईपलाईन रस्त्यावरील बायजाबाई सोसायटीमध्ये झाली. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सहकार खात्यातील निवृत्त अधिकारी जगन्नाथ बाबूराव जावळे (वय ६३) यांच्या बंगल्यात ही चोरी झाली. त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. जावळे कुटुंबीय घरात झोपले होते. स्वत: जावळे वरच्या मजल्यावर, तर त्यांचा मुलगा दुसऱ्या बेडरुममध्ये झोपला होता. हॉलमध्ये कोणीच नव्हते. चोरटय़ांनी हॉलच्या दाराचे कुलूप तोडून शोकेसमध्ये ठेवलेले १९ हजार ६०० रुपये रोख, टाटा व नोकिया कंपनीचा मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे पाच लाखांचा ऐवज चोरून नेला. जावळे यांच्या मेव्हणीच्या मुलीने, संगीता मिसाळ हिने आपले दागिने त्यांच्या घरी ठेवले होते. तेही चोरांनी लांबविले.
घरफोडीची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक संजय दराडे, अतिरिक्त अधीक्षक वीरेश प्रभु, उपनिरीक्षक भाऊसाहेब गोंदकर, अशोक गंगावणे यांनी घटनास्थळाला भेट दिली. चोरीचा तपास उपनिरीक्षक आहेरराव करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सावेडी परिसरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. भुरटय़ा चोऱ्याही वाढल्या आहेत. वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी बनली आहे.