Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

साखर दरोडय़ाबाबतचा तपास संशयास्पद - कुटे
संगमनेर, १५ मे/वार्ताहर

संगमनेर साखर कारखाना दरोडय़ातील रहस्य उलगडण्यात पोलीस यंत्रणेला अद्यापि यश

 

आले नाही. या प्रकरणात काही पडद्यामागील व्यक्ती सामील आहेत. त्याशिवाय असा दरोडा अशक्य असल्याचा आरोप नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या बाबासाहेब कुटे यांनी केला आहे.
प्रसिद्धी पत्रकात श्री. कुटे यांनी म्हटले आहे की, सुमारे साडेआठ हजार साखरपोती एकाच वेळी चोरी गेलेली नाहीत. अनेक दिवसांपासून हा प्रकार चालू होता. प्रत्यक्ष गोडावून भिंतीला भगडातून पोती बाहेर काढणे, संरक्षक भिंत ओलांडून मालमोटारीत चढविणे हे जिकिरीचे काम सहजशक्य होणार नाही. संपूर्ण दरोडय़ाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्याची उत्तरे मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दरोडाप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी कैलास सावंत आणि नगरचा व्यापारी मनोज भटेवरा यांना न्यायालयाने आज पुन्हा पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
पूर्वीच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने वरील दोघांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या वतीने वकील एकनाथ कडलग, तर सरकारी वकील पी. डी. लहाने यांनी युक्तिवाद केला.
आरोपींचा आणखी तपास करणे बाकी असल्याने ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती लहाने यांनी केली.
पोलिसांना गुन्ह्य़ाचे मुद्देमाल, पुरावे मिळाले आहेत. आता आणखी काही मिळण्याची शक्यता नसल्याने पोलीस कोठडी देऊ नये, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. दोघांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.