Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

निवडणूक निकालापेक्षा कुकडीच्या पाण्याची उत्सुकता!
श्रीगोंदे, १५ मे/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीत कोणाला मताधिक्य मिळेल, कोण विजयी होईल यापेक्षा कुकडीचे

 

पाणी कधी सुटणार, शेलारांच्या उपोषणाचे काय झाले, मुंबई-पुण्यातील बैठकीत निर्णय झाला का? अशा चर्चा मोठय़ा गांर्भायाने सुरू आहेत. राजकारणासाठी नावलौकिक असणाऱ्या या तालुक्याला आज मात्र पाण्याचे ग्रहण लागले आहे.
कुकडी धरणातून उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन मिळविण्यासाठी पुणे व नगर जिल्ह्य़ांतील नेत्यांचा मोठा आटापिटा सुरू आहे. पुणेकर पाणी श्रीगोंदेकडे येऊ देण्यास तयार नाहीत, तर श्रीगोंदेकर हक्काचे पाणी आणण्यासाठी मोठय़ा दबावतंत्राचा वापर करीत आहेत. इकडे तालुक्यात कुकडी कारखान्याचे अध्यक्ष कुंडलिकराव जगताप व पाटपाणी परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी पाटबंधारे विभागीय कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध नोंदविला.
माजी खासदार दिलीप गांधी यांनी पुणे जिल्ह्य़ातील पवार कंपनीसह वनमंत्री बबनराव पाचपुतेंवर तोंडसुख घेत पाणी सोडण्यासाठी दबाव गट बनविला. राष्ट्रवादी प्रदेश पदाधिकारी घनश्याम शेलार यांनी रास्ता रोकोपाठोपाठ उपोषणाने सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, सरकारदरबारी अद्यापि कुठलाही निर्णय झाला नाही.
ही मंडळी सरकार विरोधात मैदानात उतरली असताना तिकडे वनमंत्री पाचपुते पुणेकरांच्या आखाडय़ात एकटेच उतरले आहेत. कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष वल्लभ बेणके यांनी जुन्नर परिसरात आता शेतकऱ्यांमध्ये जागृतीच्या नावाखाली राजकीय रान पेटविले आहे. त्याच्या झळा श्रीगोंदेकरांपर्यंत कधीच पोहोचल्या आहेत. डिंबे धरणातून येडगाव धरणात पाणी सोडले जात असताना अचानक कालवा फुटला. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्याचे भासविण्यात येत आहे. कारण मुळात डिंबेतून येडगावमध्ये साधारण ७०० दशलक्ष घनफूट पाणी आले. प्रश्न आहे तो पिंपळगाव जोगे धरणातील मृतसाठय़ातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा. कारण तेथे असणाऱ्या पाण्यातून पारनेरकडे येणारा नवीन कालवा टेस्टींग करावा व नंतर पाणी येडगावकडे सोडावे हा बेणके यांचा आग्रह राजकीय डाव आहे. आता उन्हाळ्यात कालव्याची चाचणी करणे म्हणजे पाणी वाया घालणे आहे. हे दिसत असतानाही कृष्णा खोरेच्या उपाध्यक्षपदाचा दुरुपयोग करून हा अट्टाहास सुरू आहे. इकडे पाण्यावाचून शेतातील पिके जळणार असून, जनावरांना चाराही शिल्लक राहणार नाही. प्राधान्याने श्रीगोंदेकरांच्या मागणीचा विचार होणे गरजेचे होते. त्यामुळे कर्जतकरांनाही पिण्यासाठी पाणी देता आले असते.
गांधी-जगतापांचा राग, शेलारांची तळमळ व पाचपुतेंचे प्रामाणिक प्रयत्न हे सगळे श्रीगोंद्याच्या हिताचे असले तरी पाणी का सुटले जात नाही, हा सर्वसामान्यांचा सवाल पुणेकरांच्या राजकीय वजनाचे उत्तर देणारा आहे. तालुका अजून आठ दिवस कसातरी जगण्यासाठी धडपड करेल. मात्र, तरीही पाणी सुटले नाही अथवा पाऊस पडला नाही, तर मग मात्र कधीही भरून न येणारी हानी होईल. उद्या (शनिवारी) लोकसभा निवडणूक मतमोजणी आहे. मात्र, कुणालाही त्याविषयी उत्सुकता नाही. राजकीय कार्यकर्त्यांभोवती सुतकी वातावरण निर्माण झाले आहे. पाण्याचीच चर्चा गांभीर्याने होत आहे.
दोन पाण्याचे नियोजन झाले असतानाही ही वेळ का आली, नेमके पाटबंधारे विभागाचे चुकले की राजकारण्यांचे हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. आंदोलने झाली, त्यामुळे पुणेकर जागे झाले असे काहीजण म्हणत असले, तरी पुणेकर झोपले होते, हे म्हणणेही निर्थक ठरणार आहे. आज तरी सत्य हेच आहे की शेलार रुग्णालयात असून, पाण्याबाबत निर्णय झाला नसल्याने शेतकरी काळजीत पडले आहेत.