Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

कुकडीच्या पाण्याअभावी उन्हाळी पिकांचे नुकसान
वाडेगव्हाण, १५ मे/वार्ताहर

सरकारने कुकडीच्या पाण्याचे आवर्तन न सोडल्याने पारनेर तालुक्यातील कुकडी

 

कालव्यांतर्गत उन्हाळी भुईमूग पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कोहकडी येथील प्रगतशील शेतकरी वाल्मिकराव टोणगे व श्रीराम पवार यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील १९ गावांलगत कुकडी कालवा जातो. पाटबंधारे विभागाने ११ मे रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. परंतु अद्याप कालव्याला पाण्याचे आवर्तन न आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यास जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला आहे. परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो. पाण्याअभावी दुभत्या जनावरांना हिरवा चारा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे दूध उत्पादनात घट निर्माण झाली. परिणामी शेतकरी दोन्ही बाजूंनी आर्थिक संकटात सापडला. सरकारने दोन दिवसांत कुकडी कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडले, तरच शेतकरी जिवंत राहू शकतो. म्हसे, गुणोरे, जवणे, निघोज, गाडिलगाव, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण, कुरुंद कोहकडी, पाडळी रांजणगाव येथील शेतकऱ्यांची हीच भावना आहे.