Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

बाजार समितीतील सुविधांसाठी काळेंचे ढोल बजाव आंदोलन
कोपरगाव, १५ मे/वार्ताहर

कोपरगाव बाजार समितीत शेतकऱ्यांच्यासाठी, व्यापाऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा

 

मिळाव्यात, या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी बाजार समिती प्रवेशद्वारास प्रमुख मागण्यांचा फलक लावून एक तास ढोल बजाव आंदोलन केले. बाजार समितीच्या वतीने सचिव साहेबराव कोपरे यांनी निवेदन स्वीकारले.
बाजार समितीत लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी कोणत्याच सोयी-सुविधा येथे नाहीत. गत वर्षी ८७ कोटी रुपयांची कांदा मार्केटची खरेदी-विक्री होऊनही त्यासाठी स्वतंत्र जागा, शेडस् नाहीत, स्वच्छतागृह, पिण्यासाठी पाणी, शेतकऱ्यांना आरामासाठी हॉल बांधण्यात यावा, कॅन्टीन, वाहनतळाची सुविधा निर्माण करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
आपल्या निवेदनातील मागण्यांसाठी त्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर फलक लावून एक तास ढोल बजाव आंदोलन केले. सोयी-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सचिव कोपरे यांनी आश्वासन दिले.