Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

वरातीमुळे संगमनेरमध्ये वाहतुकीची कोंडी
संगमनेर, १५ मे/प्रतिनिधी

डीजेचा कर्णकर्कश आवाज.. फटाक्यांची आतषबाजी.. संगीताच्या तालावर नाचणारे

 

तरुण.. अशा शाही थाटात घोडय़ावर ऐटीत बसलेल्या नवरदेवाने मिरवणुकीची हौस भागवून घेतली. पुणे-नाशिक मार्गावरून निघालेल्या वरातीने वाहतुकीचा बट्टय़ाबोळ केला. अध्र्या किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना तब्बल अर्धा ते पाऊण तास लागला.
पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या एका अलिशान मंगल कार्यालयात काल रात्री एक विवाहसोहळा पार पडला. बसस्थानक ते मंगल कार्यालय हा साधारण अध्र्या किमीचा मार्ग. परंतु तो भर शहरातून जात असल्याने प्रचंड वर्दळीचा असतो. कोणताही अडथळा नसताना या भागात वाहतुकीची कोंडी नित्याचीच. मात्र, काही अडथळा निर्माण झाल्यास मुंगीच्या पावलाने वाहने पुढे सरकत असताना चालक आणि प्रवाशांना चरफडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
असाच प्रकार काल सायंकाळी सातच्या सुमारास घडला. उन्हामुळे सायंकाळी बाहेर पडलेल्या नागरिकांची रस्त्यावर गर्दी होती. त्याच वेळी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची मोठी रीघ लागलेली. त्यात नवरदेवाच्या वरातीची भर पडली. बसस्थानकापासून निघालेल्या वरातीने या मार्गाची एक बाजू पूर्णत अडवून धरली. भररस्त्यात शेकडो तरुण वरातीसमोर नाचत असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या. डीजेचा कर्णकर्कश आवाज, वाहनांचे हॉर्न यामुळे कोण कोणाशी काय बोलतेय, तेही समजेनासे झाले. जेमतेम अध्र्या किमीचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना अर्था ते पाऊण तास खर्ची घालावा लागला. त्यात बसमधील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. नेहमीप्रमाणे वाहतूक पोलीसही गायब होते.
लग्नावाल्यांनी आनंद जरूर साजरा करावा, त्या कार्यालयाशेजारी मोठय़ा पटांगणात नाचण्याचाही आनंद लुटावा. यावर कोणाचाही आक्षेप नाही. मात्र, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याचे भान ठेवणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया तेथे उमटली.