Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘सोमवंशीय क्षत्रिय कासार’तर्फे दहिवाले कुटुंबाला मदत
नगर, १५ मे/प्रतिनिधी

तेलीखुंट येथील इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या संदेश ज्ञानेश्वर दहिवाले

 

(वय १९) या युवकाच्या कुटुंबीयांना सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज ट्रस्टच्या वतीने ४० हजार रुपये रोख व संसारोपयोगी वस्तू मदत म्हणून देण्यात आल्या. आगीत दहिवाले कुटुंबीयांनी सर्वस्व गमविल्याने शहर-जिल्ह्य़ातील सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती, संस्थांनी त्यांना आधार द्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले.
नुकतीच ट्रस्टची यासंदर्भात बैठक झाली. दहिवाले हे सामान्य आर्थिक परिस्थितीतील कुटुंब आहे. ज्ञानेश्वर हे कायनेटिक कंपनीत रोजंदारीने काम करतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेला संदेश त्यांचा एकुलता एक मुलगा होता. दहिवाले भाडेकरू होते. आगीत इमारत जळून खाक झाल्याने ते बेघर झाले आहेत. संसाराबरोबरच एकुलता एक मुलगा गमावलेल्या या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
ट्रस्टचे दिलीप रासने, भास्करराव डिक्कर, नागनाथ पाथरकर, अशोक झोटिंग, वैभव अंभोरे, राहुल मोहिरे, प्रदीप उंडे, रमेश अंभोरे, अशोक झरकर, नाना रासने, सुहास पाथरकर, साईनाथ रासने, पत्रकार सागर वैद्य आदी बैठकीला उपस्थित होते. समाजबांधवांनी तत्काळ ४० हजारांची रोख आर्थिक मदत जमा केली. काहीजणांनी संसारोपयोगी भांडी, वस्तू देण्याचे जाहीर केले. ज्यांना मदत द्यायची असेल अशांनी वैभव अंभोरे, घासगल्ली (मोबाईल ९८२२०५६६३७), राहुल मोहिरे, इमारत कंपनी वसाहत (९८९०९९९९४८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.