Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘देशद्रोही अल्पवयीनांना कायदेशीर संरक्षण नको’
नगर, १५ मे/प्रतिनिधी

देशद्रोहाच्या गुन्ह्य़ातील अल्पवयीनांना कायदेशीर संरक्षण मिळू नये, यासाठी बालन्याय

 

अधिनियमात संसदेने दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील ज्येष्ठ वकील सतीशचंद्र सुद्रिक यांनी केली.
राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, बालन्याय अधिनियम २००० अनुसार भारतातील १८ वर्षांच्या आतील मुलांनी कोणतेही गुन्हेगारी कृत्य केल्यास भारतीय दंड संहितेनुसार त्यांच्यावर प्रौढ व्यक्तीप्रमाणे कायदेशीर कारवाई करता येत नाही. अशांना गुन्हेगार न म्हणता ‘विधीसंघर्षग्रस्त बालक’ असे संबोधण्याची तरतूद आहे. तथापि, या तरतुदीचा गैरफायदा अजमल कसाबसारखे देशद्रोही भविष्यात सर्रास घेण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे.
अल्पवयीनांना भारतात असलेल्या कायदेशीर संरक्षणाचा गैरफायदा घेऊन शेजारील देश मोठी दहशतवादी कृत्ये घडवू शकतात, अशा स्थितीत निदान मूळ भारतीय नसलेल्या व्यक्तीसाठी तरी घटनादुरुस्ती करून अशा गुन्हेगारी मुलांना कायदेशीर संरक्षण देऊ नये, अशी मागणी सुद्रिक यांनी केली आहे.