Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

साकतमधील मुलीच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा
जामखेड, १५ मे/वार्ताहर

तालुक्यातील साकत येथे १५ दिवसांपूर्वी एका बारावर्षीय मुलीस जाळून मारण्याचा प्रयत्न

 

झाला. नगर येथे सरकारी दवाखान्यात उपचार घेत असतानाच १० मे रोजी मृत्यू झाला. या मुलीच्या मृत्यूपूर्व जबाबावरून जामखेड पोलिसांनी आज खुनाचा गुन्हा दाखल केला.
तालुक्यातील साकत येथील कोमल अशोक सानप (वय १२) असे मृत मुलीचे नाव आहे. दि. २९ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास काळे कपडे घातलेल्या आणि तोंडाला काळे लावलेला एक माणूस घरी आला. त्याने पाणी पिण्यास मागितले. त्या वेळी मी घरातील फरशी पुसत होते. हातातील फरशी पुसण्याचे कापड नान्हीघरात ठेवण्यासाठी गेली असता, त्या माणसाने माझ्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले, असा मृत्यूपूर्व जबाब कोमलने दिला आहे.
दि. १० मे रोजी तिचा नगर येथील सरकारी दवाखान्यात उपचार घेत असतानाच मृत्यू झाला. जामखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, आज कोमल हिचा मृत्यूपूर्व जबाब जामखेड पोलिसांना मिळाल्यानंतर खुनाच्या गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली. याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रेय जाधव यांनी दिली.
याबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे करीत आहेत.