Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पाण्यासाठी कामत शिंगवे गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’
पाथर्डी, १५ मे/वार्ताहर

पिण्याचे पाणी तातडीने मिळावे, या मागणीसाठी आज तालुक्यातील कामत शिंगवे येथील

 

ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे व सरपंच शिवाजी मचे यांनी केले. गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने टँकर देऊ, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
तिसगाव-मिरी योजनेत कामत शिंगवे गावाचा समावेश असून, योजनेचे निकृष्ट काम झाल्याने गावाला पाणी मिळत नाही, तर गावाचा समावेश या योजनेत असल्याने गावाला प्रशासन टँकर देत नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. याच मुद्दय़ावरून काल करंजी येथील ग्रा. पं. सदस्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते.
या वेळी बोलताना कराळे म्हणाले की, या योजनेच्या अधिकाऱ्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय टँकर सुरू होत नाही. दुसरीकडे निकृष्ट योजना झाल्याने पाणी मिळत नाही. अधिकारीही वेळ मारून नेतात.

भूजल सर्वेक्षणाचा दाखला मिळताच तातडीने टँकर सुरू करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी ए. बी. ओव्हळ यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी प्रभारी तहसीलदार जालिंदर रक्ताटे उपस्थित होते.