Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पाणी योजनेच्या कामासाठी नगरसेवकांचे आंदोलन
संगमनेर, १५ मे/वार्ताहर

पाणीपुरवठा योजनेचे जलवाहिनी टाकण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावे या मागणीसाठी

 

पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने काम मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. काम पूर्ण न केल्यास ८ जुलैला पुन्हा टाळे ठोकण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला.
वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम शहरात ठिकठिकाणी सुरू होते. निळवंडे धरणातील प्रस्तावित पाणीयोजनेचे जलकुंभ पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. जुन्या वाहिन्या बदलण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या कामासाठी पालिकेने जीवन प्राधिकरणाकडे पाच कोटींचा निधी जमा केला आहे. पूर्वनियोजनानुसार दि. १५ मार्चपर्यंत हे काम पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, अद्याप निम्मेही काम झालेले नाही.
कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंधरा दिवसांपूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाहिन्या टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही काम कासवगतीने चालू आहे. अनेक ठिकाणचे रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. पालिकेने रस्त्याची डागडुजी करायची आणि प्राधिकरणाने चाऱ्या खोदायच्या या प्रकारामुळे पालिकेचे दुहेरी आर्थिक नुकसान होत आहे. उपनगरातील काही रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र खोदकाम केल्याने हे रस्ते पुन्हा दगडमातीचे झाले आहेत.
हे चित्र असेच राहिले तर आगामी पावसाळ्यात नागरिकांचे हाल होतील.
याच कारणासाठी नगरसेवकांनीच आंदोलनाचे हत्यार उपसले. सत्ताधारी नगरसेवक नीलेश जाजू, जावेद जहागीरदार, अनिस बागवान, गजेंद्र अभंग, विरोधी गटनेते अविनाश थोरात आणि काही विरोधी नगरसेवक यांनी आज जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा पवित्रा घेतला. प्राधिकरणाकडून कामाच्या पूर्ततेबाबत अक्षम्य दिरंगाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला.