Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

कॅशक्रेडिटचा दर पूर्ववत ११ टक्के करण्याची जिल्हा बँकेकडे मागणी
नगर, १५ मे/प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्य़ातील सर्व पगारदार सेवकांच्या सहकारी

 

पतसंस्थांना कॅशक्रेडिटवर गेल्या वर्षीपासून १३ टक्के व्याजदर आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे पतसंस्थांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कॅशक्रेडिटचा दर पूर्ववत ११ टक्के करावा, अशी मागणी पगारदार पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब कचरे यांनी केली आहे.
कचरे यांनी या मागणीचे निवेदन जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा बँकेकडे जिल्ह्य़ातील पगारदार पतसंस्थांच्या कॅशक्रेडिटची उचल १७३ कोटी आहे. या पतसंस्थांचे कॅशक्रेडिटपोटी असलेले शेअर्स व प्रत्येक वर्षांच्या नफ्यातून २५ टक्के रिझव्‍‌र्ह फंडाची गुंतवणूकसुद्धा जिल्हा बँकेत आहे. या शेअर्सवरती बँक ९ टक्के लाभांश देते व रिझव्‍‌र्ह फंड गुंतवणुकीवर ८ टक्के व्याज देते. या तुलनेत संस्थेस कॅशक्रेडिटवर आकारले जाणारे व्याज यात मोठी तफावत जाणवते.
तेरा टक्क्य़ांपेक्षा कमी व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात पतसंस्थांना अडचणी येत आहेत. पतसंस्थांचे कर्जदार सभासद हे कायमस्वरुपी नोकरदार असल्याने अलीकडील काळात खासगी बँका व इतर राष्ट्रीयीकृत बँका आमच्या सभासदांना, पतसंस्थांच्या व्याजापेक्षा कमी दराने व दीर्घ मुदतीचे कर्ज विनासायास देऊ लागल्याने साहजिकच सभासद अशा बँकांचे कर्ज घेऊन पतसंस्थांचे कर्ज परत करू लागल्या आहेत. परिणामी आमच्या संस्थांचे कर्ज वितरण दिवसेंदिवस कमी होत जाऊन संस्थेच्या अस्तित्वावर परिणाम होत आहे.
कॅशक्रेडिटचा व्याजदर पूर्ववत ११ टक्के केल्यास पतसंस्थांनाही कर्जावरील व्याजदर कमी करता येईल. सभासदांच्या कर्जमर्यादेत वाढ करता येईल. बँकेच्या कॅशक्रेडिटच्या उचलीतही मोठी वाढ होईल. पतसंस्थांचे कर्ज सुरक्षित आहे. त्याची परतफेड नियमित सुरू असते. या बाबीचा विचार करता स्पर्धेच्या काळात इतर वित्तीय संस्थांबरोबर पगारदार संस्था टिकाव्यात यासाठी बँकेने कॅशक्रेडिटचा दर पूर्ववत ११ टक्के करावा, अशी मागणी कचरे यांनी केली.