Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘तनपुरे’विषयी गैरसमज पसरवू नये - धुमाळ
राहुरी, १५ मे/वार्ताहर

डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाची पूर्वतयारी सध्या वेगाने सुरू आहे.

 

त्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही सुरू झाली आहे. अशा स्थितीत कारखान्याविषयी काही मंडळी द्वेषबुद्धीने गैरसमज पसरविण्याचा उद्योग करत आहेत. तो त्यांनी त्वरित थांबवावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष रामदास धुमाळ यांनी केले आहे.
कारखान्याच्या यंत्रसामग्रीची आवश्यक दुरुस्ती नियमितपणे सुरू आहे. कारखान्याच्या शेतकी विभागाच्या वतीने कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या उसाच्या नोंदी घेतल्या असून, पुढील गळीत हंगामासाठी ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध आहे. त्या उसाचा पुरवठा झाल्यास कारखाना अधिक गाळप करू शकतो. अपेक्षित गाळप झाल्यास आर्थिक अडचणी काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. कारखाना कामगारांचे दरमहा पगार, त्यांच्या इतर अनुषंगिक बाक्या, आवश्यक सरकारी देणी कारखान्याने दिली असून, प्रशासकीय पूर्तता केलेली आहे. त्याचबरोबर मजूर हजेरीवरील कामगारांचे पगार दिले आहेत. नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामात ऊसउत्पादक शेतकऱ्यांना ११०० रुपये दर देऊन वचनपूर्ती केली.
सुमारे २६ हजार ७५२ सभासदांपैकी अवघ्या ३ हजार ८०० सभासदांनीच कारखान्याला उसाचा पुरवठा केला. त्याच सभासदांना सवलतीच्या दराने साखर मिळणार आहे. अन्यत्र ऊस देणाऱ्या सभासदांना यापुढे साखर दिली जाणार नाही, असे श्री. धुमाळ यांनी सांगितले.
कारखान्याने सर्व स्तरावर काटकसरीचे धोरण अवलंबून पुढील गळीत हंगाम सुरू करण्याचा जोमाने प्रयत्न सुरू केला. मात्र, आमचे काही मित्र दररोज वेगळ्या स्वरूपाच्या अफवा उठवून कारखान्याची बदनामी करीत आहेत. तालुक्यातील कारखानारुपी उद्योग जर बंद पडला, तर पुढील कित्येक पिढय़ांचे आर्थिक नुकसान होणार आहे, म्हणून पक्षीय आणि राजकीय जोडे बाहेर ठेवून बदनामीचे षङ्यंत्र थांबवावे. कारखाना हा तालुक्यातील शेतकऱ्यांची एकमेव अर्थवाहिनी आहे. तिला जर तडा गेली आणि शेतकऱ्यांचा त्यावरील विश्वास उडाला तर तालुक्यातील शेतकरी आपणास कधीच माफ करणार नाही. म्हणून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून उसाचे टिपरूदेखील बाहेर जाणार नाही, यासाठी सर्वानी संघटित प्रयत्न करावेत. साखर उत्पादन झाले तर कारखान्याचा संचित तोटा कमी होईल आणि त्यातून कारखान्याच्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांना, कामगारांना व संबंधित घटकांना आर्थिक न्याय देता येईल. कारखाना चालू राहण्याची काळजी राजकीय मित्रांनी घ्यावी, असे श्री. धुमाळ म्हणाले.