Leading International Marathi News Daily

शनिवार, १६ मे २००९९

अग्रलेख

तिसरी घंटा!

 

आजचा हा अंक तुमच्या हातात पडेल तेव्हा तिसरी घंटा होऊन पडदा नुकताच वर गेलेला असेल. नाटक कंपनी चलाख आहे. त्यांनी पडदा वर जाण्यापूर्वी नट-नटय़ांची नावे सांगितली; पण कोणत्या भूमिकेत कोण असेल हे सांगितले नाही. नाटय़-संहिता कुणाची आहे हेही सांगितले नाही. इतकेच काय दिग्दर्शकाचे नावही गुप्त ठेवले. पूर्वी काही इंग्रजी चित्रपटांची सर्व टायटल्स शेवटी यायची, तसेच काहीसे! आज संध्याकाळी तिसरा अंक संपेल, त्यानंतर ही नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. कदाचित आणखी एक दिवस लागेल सर्व कलाकार-दिग्दर्शक-लेखक इत्यादींची नावे जाहीर व्हायला. फिरत्या रंगमंचावर जसे तीन-चार वेगवेगळे सेट्स लावून ठेवलेले असतात, तसेच नेपथ्य केले गेले आहे. आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकात लखोबा लोखंडे जसा कधी तंबाखूचा व्यापारी, तर कधी नौदल अधिकारी, कधी एखादा बुवा तर कधी एक सुसभ्य मध्यमवर्गीय सद्गृहस्थ म्हणून वेगवेगळ्या सेट्सवर अवतरतो, तशी बरीच पात्रे या नाटकात आहेत. ही पात्रे काम करीत आहेत ते नाटक मात्र आहे, ‘तो मीच आहे!’ या नावाचे. शरद पवार, चंद्राबाबू, नितीशकुमार, इतकेच काय लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान आणि दशावतारी अमरसिंगसुद्धा या फिरत्या रंगमंचावर इतक्या चपळाईने फिरत आहेत, की प्रभाकर पणशीकर वा ‘सही रे सही’मधले भरत जाधवही थक्क व्हावेत. राष्ट्रीय रंगमंचावरील या सर्व पात्रांना एकत्र आणून एक अभिनव ‘थिएटर वर्कशॉप’ विजया मेहता किंवा वामन केंद्रे घेऊ शकतील. त्या कार्यशाळेचा उपयोग देशातील राजकारणाची संहिता लिहायला आणि विविध बहुपात्री वा एकपात्री नाटके बसवायला होऊ शकेल. एकच पात्र त्याच नाटकात नायक, खलनायक, उपनायक, लोकनायक आणि सूत्रधार म्हणूनही कसे काम करू शकते, हे रंगकर्मी मंडळी शरद पवार, अमरसिंग इत्यादींकडून शिकू शकतील. हातात संहिता व संवाद नसताना इतक्या सहजतेने, इतक्या सेट्सवर सुमारे ७२ तास, विविध भूमिकांमध्ये काम करण्याचा विक्रम प्रशांत दामलेंनीही केलेला नाही. गोविंदराव आदिक यांनी सुचविले होते, की राहुल गांधींनी शरद पवारांच्या हाताखाली पाच वर्षे अ‍ॅप्रेन्टिसशिप करावी. आम्ही असे सुचवू इच्छितो, की प्रशांत दामले व भरत जाधव यांनीही नटसम्राट पवारांच्या वा अमरसिंग यांच्या कार्यशाळेत नाव नोंदवावे. जर संजय दत्त, जयप्रदा, नफीसा अली, इतकेच नव्हे तर खुद्द अमिताभ आणि जया बच्चन अमरसिंगांच्या मार्गदर्शनाखाली शिकायला तयार आहेत, तर मराठी नटांनी अस्सल मराठी माणसाची ‘मराठी अ‍ॅकॅडमी’ का सुरू करू नये? अलीकडेच शरद पवारांच्या सूचनेवरून गृहमंत्री जयंत पाटील राज ठाकरेंना भेटले ते त्याच उद्देशाने. महाराष्ट्राला रंगभूमीची दीर्घ आणि उज्ज्वल परंपरा असताना शरद पवारांऐवजी कुणा ‘भय्या’च्या हाताखाली आपल्या रंगकर्मीनी का शिक्षण घ्यावे? ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या स्फूर्तिदायक कलाकृतीचा संदेश जर आपण पाळायचा असेल तर आता राष्ट्रीय रंगमंचाची सूत्रे मराठी माणसाकडेच यायला हवीत. आपल्याला नाटककाराचे नाव व प्रत्यक्ष नाटकाचे कथानक काहीच माहीत नाही; परंतु पवारांचे एकूण ‘प्लॉट्स्’बद्दलचे ज्ञान उत्तम आहे. त्यांना सर्व प्रकारचे ‘प्लॉट्स’ त्यांच्या वैशिष्टय़ांसहित पूर्ण माहीत असतात. ते विचारात घेऊनच त्यांनी थेट तिसऱ्या अंकाचा प्लॉट पडदा वर जाताजाताच लिहायला घेतला आहे; परंतु पवारांनी एकूण तीन ‘प्लॉट्स’ लिहिले आहेत. त्यातील पहिल्या ‘प्लॉट’प्रमाणे ते सुमारे १२५ खासदारांची मोट बांधतील. त्यात भाजप-आघाडीतील कुणीही असणार नाही. मग ते काँग्रेसला सांगतील, की त्यांच्या पक्षाने पवारांच्या पंतप्रधानपदाला समर्थन द्यावे. या ‘प्लॉट’ला काँग्रेस कार्यकारिणीत विरोध होईल. मग दुसऱ्या ‘प्लॉट’चे कथानक सुरू होईल. मायावती, जयललिता, ममता, चंद्राबाबू, मुलायमसिंग-अमरसिंग, डॉ. फारुख अब्दुल्ला, इतकेच नव्हे तर भाजप आघाडीतील शिवसेना, अकाली दल आणि इतर पक्षांशी हातमिळवणी करून बिगर काँग्रेस-बिगर भाजप सरकार बनवायचा प्रयत्न होईल; परंतु अशी बेरीज अगदी काठावर असल्याने ते तिसरा ‘प्लॉट’ सादर करतील. यानुसार त्यांनी जमा केलेल्या खासदारांच्या गोळाबेरजेत भाजपने बाहेरून वा आतून सामील व्हावे असे ते म्हणतील. काँग्रेसने व्यक्तिद्वेषाने व मराठीद्वेषाने एका कर्तबगार मराठी नेत्याला पंतप्रधान होऊ दिले नाही, असा आरोप करून ते भाजपच्या मदतीने पंतप्रधान होतील. म्हणजे प्रयत्न करतील; परंतु भाजपचा पाठिंबा घेतल्यामुळे तिसरी आघाडी (मुख्यत: डावे) पवारांना पाठिंबा देणार नाही. त्याचप्रमाणे नितीशकुमारसुद्धा कदाचित पाठिंबा देणार नाहीत- वा बिहार सरकार टिकविण्यासाठी तसा करार करून देतीलही. तिसऱ्या अंकाचे हे तिन्ही प्लॉट्स यशस्वी झाले नाहीत तर ते आपण एक निष्ठावान सेक्युलर तत्त्वाचे आहोत व त्यामुळे जातीय शक्तींबरोबर जाणे शक्य नाही, असे सांगून पुन्हा काँग्रेसप्रणीत आघाडीत राहण्याची घोषणा करतील. परंतु जर भाजप आघाडीचे समर्थन घेऊन ते पंतप्रधान झालेच, तर काही दिवसांतच महाराष्ट्राचे सरकार गडगडेल. नाही तरी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका आहेतच. मग राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप-सेना अशी आघाडी पुढील चार-पाच महिन्यांसाठी सत्तेत येऊ शकेल. त्या आघाडीचे ‘हंगामी’ मुख्यमंत्री नितीन गडकरी असू शकतील. म्हणजे तिसऱ्या अंकाच्या ‘प्लॉट’मध्येच एक चित्तथरारक उपनाटय़ही पवारांनी विणलेले आहे. म्हणूनच काही नाटय़समीक्षक म्हणतात त्याप्रमाणे विजय तेंडुलकरांनंतर शरद पवार यांचेच नाव नाटककार म्हणून घेतले जाऊ शकेल. तेंडुलकरांच्या बहुतेक नाटकांमध्ये माणसे गिधाडांसारखी वागतात. पवारांच्या नाटकांमध्ये माणसांपेक्षा गिधाडे बरी, असे प्रेक्षकांना वाटू लागते. हा थोडासा विरोधाभास वगळता त्यांच्या ‘प्लॉट्स’मध्ये अनेक साम्यस्थळे असल्याचे दिसून येईल. ‘कुणीही विश्वास ठेवायच्या लायकीचा नाही’ हे सूत्र दोन्हींत समान आहे; त्याचप्रमाणे कुणीही कसाही वागला तरी त्याचे स्वत:चे एक स्वभाव-तर्कशास्त्र असते आणि कलाकार त्या विविध प्रवृत्तींचा शोध घेत असतो, ही शोधक वृत्तीही त्यांच्यात समान आहे; परंतु मागे म्हटल्याप्रमाणे एकाच वेळेस तीन कंपन्यांनी थिएटर बुकिंग केलेले असल्यामुळे इतर कंपन्यांचेही तिसऱ्या अंकाचे ‘प्लॉट्स’ तयार आहेत. जर भाजप आघाडीला २३० च्या वर जागा मिळाल्या तर लालकृष्ण अडवाणी पंतप्रधानपदासाठी दावा करू शकतील; पण भाजपला काँग्रेसपेक्षा कमी आणि रालोआला यूपीएपेक्षा कमी जागा मिळाल्या तर अडवाणीविरोधी पक्षांचे लोकसभेतील नेते होण्याऐवजी राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती घेतील. परंतु त्याच वेळेस ते नितीशकुमार यांचे नावही पंतप्रधानपदासाठी पुढे करून जमवाजमव करू शकतील. खरी पंचाईत होईल ती तिसऱ्या आघाडीची. त्यांच्या कंपनीतील पात्रे इतर कंपन्यांमध्ये जाऊ लागली आहेत. शिवाय आपण नक्की कोणत्या नाटकात काम करण्यासाठी आलो आहोत, याबद्दल त्यांच्या मनात गोंधळ असल्याने या कंपनीला, म्हणजे तिसऱ्या आघाडीला नाटय़प्रयोगच बंद केल्याचे जाहीर करावे लागेल. कदाचित त्यांची कंपनीही बंद पडेल. तर आता तिसरी घंटा झाली आहे.. बघू या आता काय होते?.. अंधार.. संगीताचे मंद सूर हळूहळू भेसूर होऊ लागतात..