Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

पुन्हा काँग्रेसच!

 

पंधराव्या लोकसभेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये अगदी कटोकटीची लढत होईल या ढोबळ अंदाजावर उजाडलेल्या ‘१६ मे’ने हे भाकित सपशेल खोटे ठरवित काँग्रेस आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीला सत्तास्थापनेचे दरवाजे सताड उघडले आहेत. सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा काँग्रेसमध्ये गेल्या सुमारे दोन दशकांत विसरला गेलेला बहुमान मनमोहनसिंग यांना मिळणे हा आता फक्त उपचार राहिला आहे. काँग्रेस आणि यूपीएने महाराष्ट्रासह जवळपास संपूर्ण देशभरात लक्षणीय कामगिरी केली आहे. त्यातही विशेष नजरेत भरण्याजोगे यश दक्षिणेने काँग्रेसच्या झोळीत टाकले आहे. केरळमध्ये डाव्या आघाडीचे वर्चस्व पूर्णपणे मोडीत काढून काँग्रेसने तेथे आपला जवळपास एकछत्री अंमल प्रस्थापित केला आहे. शेजारच्या तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि द्रमुकला जबरी फटका बसेल आणि जयललिता मोठे संख्याबळ घेऊन येतील हा अंदाज खोटा ठरवत द्रमुक -काँग्रेस आघाडीने तिथेही जोरदार आघाडी घेतली. तर आंध्र प्रदेशचा बालेकिल्ला अभेद्य राखत एकूण संख्याबळाला भक्कम आकार दिला. मात्र राजस्थान, उत्तराखंड, पंजाब आदी राज्यांमध्येही काँग्रेसने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केलीोहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या प्रभावामुळे काँग्रेस जवळपास नामशेष होईल हा होराही निष्फळ ठरला असून आपला गड राखण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे. आजच्या विजयाबरोबर काँग्रेसला इतरही अनेक गोष्टी अनुकूल झाल्या आहेत. या विजयामुळे पुढील पाच वर्षे काँग्रेस आघाडीला तुलनेत बऱ्याच निर्विघ्नपणे राज्यकारभार हाकण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. शरद पवार, डावे, लालू-मुलायम- पासवान हे त्रिकुट, मायावती आदी अनेक ‘अडथळे’ आजच्या निकालाने बाजूला झाले आहेत.