Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

मनसेचा दणका
मुंबई, १६ मे / खास प्रतिनिधी

 

राज ठाकरे यांनी मुंबई -ठाण्यात एक हाती आणलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लाटेमुळे शिवसेना- भाजप युतीच्या उमेदवारांच्या नाकातोंडात धक्कादायक पराभवाची धूळ गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठीच्या मुद्दय़ावर राज ठाकरे यांनी सातत्याने पुकारलेली आक्रमक आंदोलने मराठी मनाला विशेषत: तरुण वर्गाला भावल्याचे चित्र पुढे आले असून मनसे आणि प्रामुख्याने शिवसेना यांच्या राजकीय संघर्षांत विजयाचा लोण्याचा गोळा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या तोंडात अलगद पडला आहे !
राज ठाकरे यांचे लक्ष्य म्हणजे युतीच्या उमेदवारांचा पाडाव होता. ते त्यांनी साध्य केले आहे. मनसेने मुंबई आणि ठाण्यातील जागांवर शिवसेना आणि भाजपाला केवळ जोरदार तडाखा दिला एवढेच नव्हे तर एक - दोन जागांवर ते दुसऱ्या स्थानावर राहतील अशी चिन्हे आहेत. ठाण्यात मनसेचे उमेदवार राजन राजे आणि मुंबई दक्षिणमध्ये बाळा नांदगावकर हे सातव्या फेरीअखेर दुसऱ्या स्थानावर होते.
मनसेची मुंबईतील मुसंडी उत्तर मध्य मुंबईत स्पष्ट झाली. सातव्या फेरीअखेर प्रिया दत्त यांना एक लाख तीस हजार ३० मते मिळाली होती तर युतीच्या महेश जेठमलानी यांना ६६ हजार ५४ मते मिळाली होती. विशेष म्हणजे मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांना ६३ हजार ७५५ मते मिळाली होती. प्रारंभीच्या काही फेऱ्यांत तर प्रिया दत्त आणि सरपोतदार यांत अटीतटीची लढत सुरु होती. उत्तर - पश्चिम मतदारसंघात ९ व्या फेरीअखेर काँग्रेसचे गुरुदास कामत यांना १ लाख २९ हजार ८२८ मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांना १ लाख ९ हजार ७०७ मते मिळाली होती. या मतदारसंघात सपाकडून लढलेल्या अबु आसिम आझमी यांना ४१ हजार ७५५ तर मनसेच्या शालिनी ठाकरे यांना ६६ हजार ४८९ मते मिळाली होती. कीर्तिकर यांच्या पिछाडीला शालिनी ठाकरे कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर मुंबईत सहाव्या फेरीअखेर भाजपाचे राम नाईक आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांत चुरस होती. नाईक यांना ८६ हजार ८७३ तर निरुपम यांना ९४ हजार ७९८ मते मिळाली होती. तर मनसेच्या शिरीष पारकर यांना ६४ हजार ३५ मते मिळाली होती. पारकर यांच्या मुसंडीमुळे राम नाईक पराभवाच्या गर्तेत सापडले. नाईक यांचा हा दुसरा धक्कादायक पराभव ठरणार असून संजय निरुपम यांना पारकर यांच्यामुळे लोकसभेची लॉटरी लागली, असे चित्र सामोरे येत आहे.
ईशान्य मुंबईत मनसेच्या शिशिर शिंदेंनी सुमारे एक लाख ९४ हजार मते मिळविल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. पाटील यांनी भाजपाच्या किरीट सोमय्या यांना पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला.
दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनी सुरेश गंभीर यांचा पराभव केल्याचे वृत असून गायकवाड यांची आघाडी ७१ हजार असल्याचे समजते. मनसेच्या श्वेता परुळकर यांच्यामुळे गंभीर यांचा दारुण पराभव झाला असून गायकवाड हे या मतदारसंघातून सातत्याने दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. श्वेता परुळकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची सुमारे सव्वा लाख मते मिळवली. दक्षिण मुंबईत मोहन रावले पहिल्या फेरीपासूनच तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. काँग्रेसचे मिलिंद देवरा आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांतच येथे अटीतटीची लढत झाली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा मिलिंद देवरा आघाडीवर होते.