Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेसमध्ये उत्साह तर राष्ट्रवादीत निराशा !
मुंबई, १६ मे / खास प्रतिनिधी

 

राज्यात सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सर्वाधिक जागांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसला मागे टाकल्याचे दुहेरी समाधान काँग्रेसला लाभले आहे. शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ावर भर देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने निकाल फारसा उत्साहवर्धक ठरलेला नाही. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रसेबरोबर आघाडी करण्यास काँग्रेसमध्ये विरोध होता. त्यातच काँग्रेसचे उमेदवार असलेल्या काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अपशकून करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार २५ जागा लढविलेल्या काँग्रेसच्या वाटय़ाला १५ जागा येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मिळालेले चांगले यश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना फायदेशीर ठरणार आहे. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने नेतृत्वबदल करून मुख्यमंत्रीपदी चव्हाण यांची निवड केली होती. कमी वेळेत चांगले यश मिळून देण्याचे चव्हाण यांच्यापुढे आव्हान होते. काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाल्याने चव्हाण यांचे नवी दिल्लीदरबारी अर्थातच वजन वाढले आहे. चांगल्या जागांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा चांगले यश मिळाले याचा काँग्रेसला अधिक आनंद झाला आहे. राज्यातील जनतेने काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक व्हाण यांनी व्यक्त केली.
राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवले होते. शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या मुद्दयावर राष्ट्रवादीने प्रचारात भर दिला होता. मात्र राष्ट्रवादीला गेल्या वेळएवढय़ाच जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने मराठा कार्ड वापरल्याने मराठेतर मतदारांनी राष्ट्रवादीला फारसा पािंठबा दिल्याचे चित्र दिसत आहे. सातारा, माढा, बारामती या जागा जिंकल्या आहेत. ठाणे व ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले आहे. या दोन्ही ठिकाणी मनसेचा युतीला फटका बसला.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या चांगल्या यशामुळे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होईल, याबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. या निकालाचे पडसाद नक्कीच विधानसभा निवडणुकीत पडल्याशिवाय राहणार नाही. या निकालामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी विधानसभा निवडणुकीत निश्चित कायम राहिल हे निश्चित !