Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

‘त्यांच्या’करिता आणखी एक सामान्य दिवस
मुंबई, १६ मे/प्रतिनिधी

 

पंतप्रधानपदाचे उमेदवार अन् मंत्रीपदाचे दावेदार, शेअरबाजारातील सटोडिया आणि निवडणुकीवरील सट्टेबाज, सेफॉलॉजिस्ट अन् पत्रकार यांचे लक्ष लोकसभा निवडणुकीच्या आजच्या निकालावर लागले होते. मात्र त्याचवेळी हातावर पोट असलेल्या बहुसंख्य मुंबईकरांकरिता आणखी एक सामान्य दिवस होता. राजकीय नेते आणि पक्ष यांच्यावरील नाराजीमुळे मुंबईकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती.
डोंबिवलीत घरोघरी जाऊन पोळ्या लाटणाऱ्या सावित्रीबाई सावंत यांना निवडणूक निकालाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, आठ-पंधरा दिवसांपूर्वी आमच्या नगरसेवकाने आम्हाला मतदानाकरिता घरातून बाहेर काढले होते. त्याच निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे का? आम्ही त्यावेळी नगरसेवकाने सांगितले त्याला मत दिले. आम्हाला त्यातले काय कळते. ठाण्यातील मकरंद दिघे यांना निवडणूक निकालाबाबत उत्सुकता आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, मी एका खासगी कंपनीत नोकरीला होतो. दोन वर्षांपूर्वी कंपनीने आम्हा कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढले. त्याची केस सुरू आहे. सध्या एका छोटय़ा कुरियर कंपनीत काम करीत आहे. आमच्या जीवनात निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी काय फरक पडणार. त्यामुळे निकालाकडे माझे जराही लक्ष नाही.
माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयातील विद्यार्थी अभिजित यालाही निवडणूक निकालात रस नाही. तो म्हणाला की, पंतप्रधानपदाचे काँग्रेसचे उमेदवार मनमोहन सिंग आणि भाजपचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी या दोघांचे वय पाहता आम्हा तरुणांना ते आकर्षित करू शकत नाहीत. काँग्रेसने प्रियंका अथवा राहुल गांधी यांना पंतप्रधान केले तर तरुणांना राजकारणात रस वाटेल. सध्या आयपीएल सुरू असून निवडणूक निकालापेक्षा ते सामने अधिक रंजक वाटतात. मुंबई इंडियन्स पिछाडीवर गेली असली तरी आता मी चेन्नईबरोबर आहे. महापालिकेतील कर्मचारी सुप्रिया करंबेळकर यांनीही मतमोजणीत औत्सुक्य नसल्याचे सांगितले. कोणीही सत्तेवर आले तरी आमचे प्रश्न सुटणार नाहीत, याची आम्हाला पक्की खात्री आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. पुन्हा असे हल्ले होणार नाहीत असे छातीठोकपणे सत्तेवर येणारे सांगू शकतील का? मग आम्हाला त्यांचे काय कौतुक!