Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

संजय पाटील विजयी
मुंबई, १६ मे / प्रतिनिधी

 

मुंबई ईशान्य मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील हे जवळपास सात हजार मतांनी विजयी झाल्याचे वृत्त आहे. त्यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार किरीट सोमैय्या यांचा पराभव केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष शिशिर शिंदे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. मात्र त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांचा विजय सुकर केला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम नाईक हे काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यापेक्षा पिछाडीवर होते. मुंबई वायव्य मतदारसंघात काँग्रेसच्या गुरुदास कामत यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे गजानन कीर्तिकर हे त्यामुळे पराभवाच्या छायेत आहेत. मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात अटीतटीची लढत सुरू असली तरी तिसऱ्या फेरीनंतर शिवसेनेचे सुरेश गंभीर हे काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्यापेक्षा पिछाडीवर होते. मुंबई दक्षिण मतदारसंघात शिवसेनेचे मोहन रावले हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले असून तेथे काँग्रेसचे मिलिंद देवरा आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यात अटीतटीची लढत सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात भाजपचे अ‍ॅड. महेश जेठमलानी पहिल्यापासूनच तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले असून काँग्रेसच्या प्रिया दत्त विजयाकडे आगेकूच करीत आहेत. मुंबईतील सहाही मतदारसंघामध्ये मनसेने शिवसेना-भाजप युतीला मोठा फटका दिला आहे.