Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

युतीच्या बालेकिल्ल्याला मनसेचा सुरुंग
ठाण्यातून संजीव नाईक, कल्याणमधून आनंद परांजपे, भिवंडीतून सुरेश टावरे, तर पालघरमधून बळीराम जाधव विजयी
ठाणे, १६ मे /प्रतिनिधी

 

शिवसेनेच्या स्थापनेपासून बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चाखायला लावत राष्ट्रवादीने विजयी पताका रोवली असून, कल्याणमध्ये मात्र शिवसेनेने आपला गड कायम राखला. भिवंडीने नेहमीप्रमाणे काँग्रेसला साथ दिली असून, पालघर मतदारसंघात मात्र प्रमुख राजकीय पक्षांना धक्का देत बहुजन विकास आघाडीने विजय मिळवला. या विजयामुळे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे जिह्यातील वजन वाढले. त्याचवेळी रायगड मतदारसंघातून दहाव्या फेरीअखेरीस ६३ हजारांची आघाडी घेणारे शिवसेनेचे अनंत गिते यांचा विजय अर्थात बॅ. अ.र.अंतुले यांचा पराभव निश्चित झाला आहे. तर सुरुवातीला अटीतटीच्या वाटणाऱ्या सिंधुदुर्गमधील लढतीत नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे सुरेश प्रभू यांचा १८ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला.
गेले १५ दिवस सर्वाचीच उत्सुकता शिगेला पोचलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी कडेकोट बंदोबस्तात सुरू झाली. ठाणे लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासून राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांनी आघाडी घेतली. आठव्या फेरीअखेर विजय चौगुले यांना जुजबी आघाडी मिळवता आली, मात्र नवव्या फेरीपासून नाईक यांनी आघाडी कायम ठेवत सुमारे ५० हजारांचे मताधिक्य मिळवत विजय मिळवला. सहाव्या फेरीला आपले मताधिक्य घटत असल्याचे लक्षात येताच शिवसेना उमेदवार विजय चौगुले मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. त्यानंतर तेथे जमलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनीही परिस्थीतीचा अंदाज घेत घरचा रस्ता धरला. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. या पराभवामुळे शिवसेनेला प्रचंड धक्का बसला असून राष्ट्रवादीत विजयोत्सव साजरा होत आहे.
ठाणे शहराने शिवसेनेला नेहमी साथ दिली आहे. यावेळेस मात्र मनसेने शहरातून ४१ हजार मते मिळवली, शिवसेनेला ४४ हजार मते मिळाली. म्हणजेच ठाणे शहरात मनसेवर शिवसेनेने घेतलेली आघाडी फक्त तीन हजारांची होती.
नव्याने निर्माण झालेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आनंद परांजपे यांनी विजयी परंपरा कायम राखीत सुमारे २५ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. आज आनंद परांजपे यांचा वाढदिवस असल्याने आजचा विजय म्हणजे त्यांना वाढदिवसाचीच भेट मिळाली. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचा पराभव केला. मनसेच्या वैशाली दरेकर राणे यांनी कडवी झुंज देताना ५० हजारांहून अधिक मते मिळवली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने विजयाची परंपरा कायम राखली असून, काँग्रेसचे सुरेश टावरे यांनी ४१ हजार मतांची दणदणीत आघाडी घेत भाजपा-सेना युतीचे जगन्नाथ पाटील यांचा पराभव केला. टावरे यांना एक लाख ८२ हजार ७८१, तर जगन्नाथ पाटील यांना एक लाख ४१ हजार ४१६ व मनसेचे डी.के.म्हात्रे यांना एक लाख सात हजार मते मिळाली. मनसेने टावरे यांचा विजय सोपा केला. समाजवादीचे आर.आर. पाटील व कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांना मात्र मतदारांनी फारशी साथ दिली नाही.
पालघर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार दामोदर शिंगडा यांचा पराभव झाला असून तेथून प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे सुमारे २४ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. बहुजन विकास आघाडी ही आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्थापन केलेली आघाडी आहे. भाजपाचे चिंतामण वनगा यांनी जाधव यांच्याशी कडवी झुंज दिली, तर शिंगडा तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.