Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेसची मुसंडी

 

काँग्रेस आणि भाजप याच दोन पक्षांमध्ये सत्तास्थापनेसाठी चुरशीची लढत होईल हा सर्वसाधारण अंदाज सपशेल फोल ठरवित काँग्रेसने देशभरात जोरदार मुसंडी मारली आहे. जवळपास सर्वच राज्यांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला मोठा आधार दक्षिणेकडील राज्यांनी दिला. केरळमध्ये डाव्यांचे वर्चस्व पूर्णपणे संपवत काँग्रेसने तेथे आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला असून आंध्र प्रदेशमध्ये आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. शेजारच्या तामिळनाडूमध्ये जयललिता या वेळी मागील पराभवाचे उट्टे काढतील हा अंदाजही काँग्रेस आणि द्रमुक आघाडीने खोटा ठरविला. या ‘दक्षिण दिग्विजया’मुळे काँग्रेसला ‘दिल्ली दरवाजा’ सहजी उघडला गेला.
सगळ्यात विशेष म्हणजे मागील लोकसभेत काँग्रेसला सतत ओलीस धरणारे शरद पवार, लालू यादव, रामविलास पासवान, मुलायमसिंग, मायावती आणि सगळ्यात त्रासदायक डावे या सगळ्यांनाच आजच्या निकालांनी जमिनीवर आणले आहे. या सगळ्या मंडळींचा आवाज एकदम खाली आला आहे. काँग्रेसला अटी घालणाऱ्या या मंडळींना आता अक्षरश: विनाशर्त पाठिंबा देणे भाग पडणार आहे. या मंडळींनी पाठिंबा दिला नाही तरी काँग्रेस आपल्या सहकारी घटक पक्षांसह सरकार स्थापन करू शकते हे चित्र स्पष्ट झाले आहे. निकालांच्या केवळ एक दिवस आधी ‘बिहारला विशेष दर्जा’ मागणाऱ्या नितीशकुमारांनाही या निकालांची झळ बसली आहे. बिहारमध्ये लालू-पासवान यांची जहागिरी मोडून काढण्याचा भीमपराक्रम करणाऱ्या नितीशकुमारांना नव्या समीकरणात फार काही वेगळे करता येण्याची शक्यता आता अंधुक झाली आहे. याचबरोबर पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या महाराष्ट्रातील शरद पवारांपासून लालू, मुलायम, चंद्राबाबू, मायावती, जयललिता आदी नेत्यांची स्वप्नेही आता दिवास्वप्ने झाली आहेत. परिणामी काँग्रेसला मुक्त अर्थव्यवस्था आणि भारत-अमेरिका अणुकरार या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेण्याची मोकळीक मिळणार आहे.
दुसरीकडे भाजपप्रणीत रालोआला बिहार वगळता सगळीकडेच मोठा धक्का बसला आहे. नितीशकुमार यांच्या मदतीने बिहारमध्ये लालू-पासवान आणि काँग्रेस यांना जवळपास हद्दपार करणाऱ्या रालोआला इतरत्र कुठेही अशी कामगिरी करता आलेली नाही. दिल्लीमध्ये तर सातही जागांवर या आघाडीला पराभवाची नामुष्की पदरात पडली आहे. देशात जवळपास कुठेही ‘प्रस्थापितविरोधी’ मतदान झालेले नाही हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश या निकालाने दिला आहे. राज्यांमध्ये ज्या ज्या पक्षाची सत्ता आहे तेथे साधारणपणे त्याच पक्षाने आपापले गड राखले आहे. अपवाद फक्त केरळ आणि प. बंगाल या डाव्यांच्या बालेकिल्ल्याचा.
या दोन्ही ठिकाणी डाव्यांना जबर फटका बसला आहे. डाव्यांचा हा आजवरचा बहुधा सगळ्यात वाईट पराभव मानला जात आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली आदी बहुतांश राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या पक्षांना जनतेने स्वीकारले असल्याचे दिसत आहे. अर्थात उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मात्र संमिश्र निकाल हाती आले आहेत.