Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

हे जिंकले..
गोवा

 

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे फ्रानिस्को सारदिन्हा यांनी भाजपचे नरेंद्र सावईकर यांचा १२,५१६ मतांनी पराभव केला.
लक्षद्वीप
कवराट्टी : लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पी. एम. हमदुल्ला हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. पूंकुंजी कोया यांचा २,१९८ मतांनी पराभव केला. २७ वर्षांचे हमदुल्ला हे माजी केंद्रीय मंत्री पी. एम. सईद यांचे पुत्र आहेत. सईद यांनी १९६७ ते २००४ अशी सलग ३७ वर्षे येथून खासदारकीची निवडणूक जिंकली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत कोया यांनी त्यांच्या वर्चस्वाला धक्का देत अवघ्या ७१ मतांनी विजय मिळविला होता.
केरळ
कन्नूरमधून काँग्रेसचे के. सुदर्शन हे विजयी झाले. त्यांनी त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी के. के. रागेश यांचा ४० हजार मतांनी पराभव केला. त्रिचूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पी. सी. चाको हे विजयी झाले. त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे सी. एन. जयदेवन यांचा २५ हजार मतांनी पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी वडकारा येथील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विद्यमान खासदार पी. साथीदेवी यांना ५५ हजार मतांनी पराभूत केले. पलक्कड येथे मार्क्‍सवादी पक्षाचे एम. बी. राजेश यांनी काँग्रेसचे सतीशन पचेनी यांना १.१९४ मतांनी पराभूत केले. काँग्रेसचे पी. टी. थॉमस यांनी इडुक्की येथे आपले निकटचे प्रतिस्पर्धी व कर्नाटक काँग्रेसचे उमेदवार के. फ्रान्सिस यांचा ७० हजार मतांनी पराभव केला.
कोलम येथून काँग्रेसचे एन. पीठांबरा कुरुप विजयी झाले. त्यांनी माकपचे पी. राजेंद्रन यांचा १९ हजार मतांनी पराभव केला. एर्नाकुलम येथून काँग्रेसचे के. व्ही. थॉमस यांनी माकपचे सिंधू जॉय यांचा १० हजार मतांनी पराभव केला. चालाक्कुडी येथून काँग्रेसचे के. पी. धनापलन यांनी माकपचे यू. पी. जोसेफ यांना ७० हजार मतांनी पराभूत केले. अत्तिंगळ येथे माकपचे ए. संपत यांनी काँग्रेसचे जी. बालचंद्रन यांना १८ हजार मतांनी पराभूत केले. कोझीकोड येथे काँग्रेसचे एम. के. राघवन यांनी माकपचे के. मुहम्मद रियाझ यांना तीन हजार मतांनी हरविले. काँग्रेसचेच एम. आय. शहानवाज हे वयानाड येथून कम्युनिस्ट पक्षाचे एम. रहमतुल्ला यांना १ लाख २६ हजार मतांनी हरवून विजयी झाले.
दमण दीव
भाजपचे उमेदवार लालूभाई पटेल यांनी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार डा'ााभाई पटेल यांना २४ हजार ८३८ मतांनी धूळ चारत विजय मिळविला.
कर्नाटक
माजी पंतप्रधान व निधर्मी जनता दलाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी हसन मतदारसंघात विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे के. एच. हनुमेगौडा यांचा एक लाख ७ हजार १४३ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे एच. विश्वनाथ यांनी म्हैसूर लोकसभा मतदारसंघातून आपले प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे सी. एच. विजयशंकर यांचा ७,६९१ मतांनी पराभव केला. भाजपचे विद्यमान खासदार रमेश सी. जिगाजिनागी यांनी विजापूर राखीव लोकसभामतदारसंघात काँग्रेसचे प्रकाश के. राठोड यांना ४२ हजार ४०४ मतांनी धूळ चारली. भाजपचेच जे. शांता यांनी बेल्लारी लोकसभामतदारसंघात काँग्रेसचे एन. वाय. हनुमंतप्पा यांना २.२४३ मतांनी पराभूत केले. भाजपचे जनार्दन स्वामी यांनी चित्रदुर्ग मतदारसंघात काँग्रेसचे आपले नजिकजे प्रतिस्पर्धी डॉ. बी. थिम्पस्वामी यांचा १ लाख २० हजार मतांनी पराभव केला. भाजपने चिक्कोडीची जागा कायम राखली आहे. तेथून व्ही. रमेश कट्टी यांनी काँग्रेसचे प्रकाश बी. हुक्केरी यांचा ५५ हजार ४९ मतांनी पराभव केला.
गुजरात
भाजप उमेदवार जयश्रीबेन पटेल यांनी मेहसाणातून काँग्रेसचे विद्यमान खासदार जीवाभाई पटेल यांना २१ हजार मतांनी पराभूत केले. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर तयार झालेल्या नवसारी येथून भाजपचे सी. आर. पाटील हे ८० हजार ६७६ मतांनी जिंकले. त्यांनी काँग्रेसचे धनसुख राजपूत यांना धूळ चारली.
मध्य प्रदेश
काँग्रेसचे अरुण यादव यांनी पश्चिम खांडवा मतदारसंघातून भाजपचे नंदकुमार सिंग चौहान यांचा ४० हजार मतांनी पराभव केला.