Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

विदर्भात सेना भाजप सहा, काँग्रेस-राष्ट्रवादी चार जागी आघाडीवर
पटेल, दत्ता मेघे, मुत्तेमवार, वासनिक विजयाच्या मार्गावर
नागपूर, १६ मे / प्रतिनिधी

गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात एकमेव जागा मिळवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यावेळच्या निवडणुकीत किमान चार जागा मिळतील, असे प्रारंभिक चित्र आहे. राष्ट्रवादीचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, सरचिटणीस मुकुल वासनिक आणि केंद्रीय पारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांचा संभाव्य विजेत्यांत समावेश असून विदर्भातील उर्वरित सहा जागी
सेना-भाजप युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

नागपूरला काँग्रेसचे विलास मुत्तेमवार आणि भाजपचे बनवारीलाल पुरोहित यांच्या अतिशय चुरशीची लढत सुरु असून प्रत्येक फेरीअखेर चित्र बदलत असल्याने साऱ्यांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा आठव्या फेरीत काँग्रेसचे विलास मुत्तेमवार जवळपास ११ हजार मतांनी पुरोहित

 

यांच्यापेक्षा आघाडीवर होते. पहिल्या फेरीत १७०० मतांनी आघाडीवर असलेले विलास मुत्तेमवार चवथ्या फेरीत सहा हजार मतांनी पिछाडीवर फेकले गेले. त्यामुळे काँग्रेसच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु, आठव्या फेरीची मतमोजणी सुरू झाल्यावर चित्र बदलले आणि त्यांनी बनवारीलाल पुरोहित यांना ११ हजारावर मतांनी पिछाडीवर सोडले. ही जागा काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. ही एकमेव जागा गेल्या निवडणुकीत काँग्रेसने जिंकली होती. पक्षांतर्गत कुरबुरीमुळे मुत्तेमवारांना ही निवडणूक कठीण जाणार असेच वातावरण होते. मतमोजणी संथपणे सुरू असून प्रत्येक फेरीनंतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी फेरमतमोजणीची मागणी करत असल्याने सायंकाळशिवाय निकाल हाती येण्याची शक्यता नाही. वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी भाजपचे सुरेश वाघमारे यांच्यावर ९० हजारावर मतांची निर्णायक आघाडी घेतल्याने काँग्रेसने ही जागा जिंकल्यातच जमा आहे. भंडारा-गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल दहाव्या फेरीअखेर भाजपचे शिशुपाल पटले यांच्यापेक्षा १लाख ४२ हजार ४०५ मतांनी पुढे आहेत. ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्यातच जमा आहे.
रामटेकमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक पाचव्या फेरीअखेर ९ हजारावर मतांनी आघाडीवर होते. वासनिक यांना ६५,२२६ तर शिवसेनेचे कृपाल तुमाने ५६४६१ मते मिळाली होती. बसपचे प्रकाश टेंभुर्णे यांना ११,०१५ मते, तर सुलेखा कुंभारे यांना ८३३७ मते मिळाली होती.
चंद्रपूरमध्ये भाजपचे हंसराज अहीर हे काँग्रेसचे नरेश पुगलिया यांच्यापेक्षा ८५०० मतांनी आघाडीवर आहेत. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे हरिभाऊ राठोड पाचव्या फेरी अखेर माघारलेले होते. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात भाजपचे अशोक नेते दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांच्यापेक्षा आघाडीवर असून नेते यांना ४९,७३९ तर कोवासे यांना ४४९९२, बसपचे राजे सत्यवान आत्राम यांना १८१७९ अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे भारिप-बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा आठव्या फेरी अखेर १९,२७० मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे बाबासाहेब धाबेकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
रामटेक लोकसभा मतदारसंघात आज सकाळी अतिशय धीम्या गतीने मतमोजणीला सुरुवात झाली. पाचव्या फेरीची मतमोजणी सुरू असताना काँग्रेसचे मुकुल वासनिक हे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्यापेक्षा सुमारे ११०१५ मतांनी आघाडीवर होते. पहिल्या फेरीत वासनिक यांना १३०९९, तुमाने यांना १०,६७४ मते मिळाली. बसपचे प्रकाश टेंभुर्णे यांना २८७० तर पीरिपाच्या सुलेखा कुंभारे यांना १४७८ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत वासनिक यांनी २६,८७५ तर तुमाने यांनी २२,७२१ मते घेतली होती.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात बाराव्या फेरीअखेर शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांच्यापेक्षा ५० हजारावर मतांनी आघाडीवर आहे. पहिल्या फेरीत फक्त ८२१ मतांनी आघाडीवर असलेल्या प्रतापरावांची आघाडी प्रत्येक फेरीगणीक वाढतच गेली ती आता निर्णायक स्थितीत पोहोचली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात (राखीव) चवथ्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळ २३ हजार मतांनी आघाडीवर असून त्यांना ८८,५८१ तर रिपाइं (काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थित) डॉ. राजेंद्र गवई यांना ६४८८७, अपक्ष राजेंद्र जामठे यांना १९०१२ मते मिळाली होती.
नागपूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीदरम्यान प्रचंड गोंधळ झाला. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि वृत्तसंकलनासाठी आलेल्या पत्रकारांना कळमनातील मतमोजणी परिसरात शिरण्यास प्रवेशिका असूनही मज्जाव करण्यात आल्याने गोंधळाला सुरुवात झाली.
मात्र, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यातील बैठकीनंतर पत्रकारांना प्रवेश देण्यात आला. प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ‘दंडुकेशाही नही चलेगी’, अशा घोषणा दिल्याने गोंधळाचे वातावरण होते. नंतर हा गोंधळ शमला.

आमदार बच्चू कडू यांना मारहाण
अमरावतीला मतमोजणी केंद्राबाहेर अपक्ष आमदार व प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी अद्याप कोणाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.