Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

पुण्यात सुरेश कलमाडी आघाडीवर
पुणे, १६ मे / प्रतिनिधी

 

पुणे लोकसभा मतदार संघात सहाव्या फेरीअखेर कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश कलमाडी यांनी १६ हजार ९७३ मतांची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या एकूण २१ फे ऱ्या होऊन अंतिम निकाल जाहीर व्हायला सायंकाळ उजाडणार आहे. पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची आकडेवारी पाहता शिवाजीनगर, पर्वती आणि कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात कलमाडी यांना पहिल्या फेरीपासून आघाडी मिळाली आहे. तर कसबा, कोथरुड आणि वडगाव शेरी मतदार संघात भाजपचे अनिल शिरोळे यांना आघाडी मिळाली असली तरी ती अल्पशीच आहे. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीतही हाच कल कायम राहिला असून वडगावशेरी आणि कोथरुड मतदार संघातही कलमाडी यांना चांगली मते मिळाली आहेत. कॅन्टोन्मेंट मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेर बहुजन समाज पक्षाचे डी. एस. कुलकर्णी यांनी चांगली मते घेतली असून या मतदारसंघात त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. मनसेचे रणजित शिरोळे यांनीही काही ठिकाणी लक्षणीय मते घेतली आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिवाजीनगर येथील धान्य गोदामात सकाळी आठ वाजता सुरू झाली. प्रारंभी टपाली मतांच्या मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पुण्यातील ७०१ जणांनी टपाली पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला आहे. हे मत वैध धरण्यासाठीचे अनेक निकष असल्यामुळे ही मतमोजणी दीर्घ काळ चालणार आहे. यंदा प्रथमच मतमोजणीसाठी केंद्रीय निरीक्षकांबरोबर ‘स्टॅटीक ऑब्झव्‍‌र्हर’ या स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या नियंत्रणाखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी साडेचार हजार कर्मचारी नेमण्यात आले असून सात हजारांहून अधिक पोलिंग एजंट नेमलेले आहेत. मतमोजणी कर्मचाऱ्यांना पहाटे पाच वाजताच मतमोजणी केंद्रात बोलाविण्यात आले. उमेदवारांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यायला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. सहा विधानसभांसाठी सहा स्वतंत्र गोदामांमध्ये मतमोजणी सुरु असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ टेबलवर मतमोजणी केली जात आहे.
कलमाडी यांची आघाडी प्रत्येक फेरीनंतर वाढत असल्याचे दिसल्यामुळे उपस्थित कॉँग्रेस कार्यकर्त्ये आणि नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले तर भाजपचे कार्यकर्ते हक्काच्या मतदारसंघात आघाडी मिळेल, या आशेवर चर्चा करताना दिसत होते. भाजप सेनेचे बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोथरुड मतदारसंघातही कलमाडी यांना चांगली मते मिळत असल्याने कॉँग्रेस कार्यकर्त्यांंचा उत्साह वाढला होता. कसबा वगळता भाजपचे शिरोळे यांना कलमाडी यांच्यावर मोठी आघाडी घेता आलेली नाही. कलमाडी यांचे मताधिक्य वाढत गेल्याने बाहेर जमलेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साडेदहाच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे दूरध्वनी खणखणू लागले. पुणे आणि जिल्ह्य़ातील अन्य मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होत असतानाच मतमोजणी केंद्रातील राजकीय कार्यकर्ते राज्यातील व देशातील चित्र काय आहे यावर चर्चा करू लागले होते.

आमदारांना प्रवेश नाही!
मतमोजणी केंद्रात यावेळी विद्यमान आमदारांना प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी, नगरसेवक केंद्रात आणि आमदार बाहेर असे चित्र पाहायला मिळाले.

चोख बंदोबस्त
मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवला असल्याने राजकीय कार्यकत्यार्ंच्या वर्दळीवर चांगलाच रोख लागला. प्रत्येक गोदामाच्या बाहेर मंडप टाकला असल्यामुळे सावली निर्माण झाली होती. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे टॅेकर, प्रथमोपचार, प्रसाधनगृह, अग्नीशामक दल अशी सर्व व्यवस्था होती.