Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

पुणे जिल्ह्य़ात सुळे, आढळराव, बाबर यांची निर्णायक आघाडी
पुणे, १६ मे/ प्रतिनिधी

 

पुणे जिल्ह्य़ातील बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांता नलावडे यांच्यावर सहाव्या फेरीअखेर १ लाख २५ हजारांची आघाडी मिळविली होती. शिरूरमधील आमदार विरुद्ध खासदार लढतीत शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी सोळाव्या फेरीपर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार विलास लांडे यांच्यावर तब्बल १ लाख ६० हजारांची आघाडी घेतली होती. तर मावळमध्ये शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांच्यावर सहाव्या फेरीअखेर २८ हजार ६४३ मतांनी आघाडी घेतली होती.
आढळराव १ लाख ६० हजारांनी आघाडीवर
शिरूरमधील आमदार विरुद्ध खासदार अशा लक्षवेधी लढतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी मतमोजणीच्या सोळाव्या फेरीपर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार विलास लांडे यांच्यावर तब्बल १लाख ६० हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली. त्यामुळे सेनेच्या गोटामध्ये प्रचंड उत्साह संचारला, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. सहाव्या फेरीत आढळराव यांनी आघाडी घेताच लांडे यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. आढळराव यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. पहिल्याच फेरीमध्ये त्यांना सहा हजार मतांची आघाडी मिळाली. तर तिसऱ्या फेरीअखेर त्यांनी ३५ हजारांची आघाडी घेतली. सहाव्या फेरीमध्ये ६३ हजारांची आघाडी जाहीर होताच शिवसैनिकांनी प्रचंड जल्लोष केला.
मावळात बाबर यांना आघाडी
मावळ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर यांनी सहाव्या फेरीअखेर २८ हजार ६४३ मतांनी आघाडी घेतल्याने त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र दुपारी बारापर्यंत स्पष्ट झाले. त्यांना पाचव्या फेरीअखेर एक लाख १७ हजार ८१२ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांना ८९ हजार १७९ मते मिळाली. बाबर यांनी सर्वच विधानसभा मतदारसंघांतून आघाडी घेतल्याने राष्ट्रवादीच्या विरोधात हा धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. सामान्य जनतेच्या आघाडीचे मारुती भापकर यांना सहाव्या फेरीअखेर ४ हजार १५४ मते मिळाली होती.
बारामतीत सुळे आघाडीवर
बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सहाव्या फेरीअखेर सुमारे ७१ हजार मतांची आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीपासून सुळे यांनी आपली आघाडी कायम ठेवली. पहिल्या फेरीत त्यांनी १८ हजार ५२६ मतांची आघाडी घेतली. भाजप सेनेच्या उमेदवार कांता नलावडे यांना केवळ सात हजार ९४ मते मिळाली. त्यानंतर प्रत्येक फेरीत दहा ते पंधरा हजारांची आघाडी घेत सहाव्या फेरी अखेर सुळे यांनी ७१ हजारांची आघाडी मिळविली. मतमोजणीला सकाळी वेळेवर सुरुवात झाली तरी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतमोजणी होत असल्याने फेरीनिहाय निकाल देण्यास तासाचा अवधी लागत होता.