Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

मंडलिक, शेट्टी आघाडीवर
दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीची पीछेहाट
पुणे, १६ मे/ प्रतिनिधी

 

पंधराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण महाराष्ट्रात पक्षाला समिश्र यश मिळाले आहे. साताऱ्यात विजय व माढा मतदारसंघात निर्णायक आघाडी मिळाली असली तरी हातकणंगले, कोल्हापूर या त्यांच्या घरच्या मतदारसंघातच पिछाडीवर होते. माढय़ात शरद पवार, सोलापूरमध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, सांगलीत प्रतिक पाटील, हातकणंगलेत अपक्ष उमेदवार राजू शेट्टी आणि कोल्हापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सदाशिव मंडलिक यांनी मोठी आघाडी घेतली होती. सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांचा दोन लाख ९७ हजार ५१५ मतांनी पराभव केला.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि उमेदवार शरद पवार हे नवव्या फेरीअखेर सव्वालाख मतांनी आघाडीवर होते. तर सोलापूर मतदार संघात केंद्रीय मंत्री आणि कॉँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी बाराव्या फेरीअखेर ७१ हजारांची निर्णायक आघाडी घेतली आहे. नवव्या फेरीअखेर पवारांना १ लाख ९७ हजार ३५० मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांना ६८ हजार ९९ मते मिळाली. सोलापूर मतदारसंघात बाराव्या फेरीअखेर शिंदे यांना २ लाख ४६ हजार ३७ मते मिलाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे शरद बनसोडे यांना १ लाख ७४ हजार ७४२ मते मिळाली होती.
कोल्हापूर, हातकणंगलेत अपक्ष
कोल्हापूर जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात डावी आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार माजी खासदार सदाशिवराव मंडलिक हे १५ व्या फेरीअखेर सुमारे २१ हजार मते घेऊन आघाडीवर असून हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवारी राजू शेट्टी यांनी तब्बल ७ व्या फेरीअखेर तब्बल २५ हजारांची आघाडी घेवून जिल्ह्य़ाच्या राजकारणाच्या बदलाचे संकेत दिले आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे अनेक मातब्बर नेते एकत्र आले होते. परंतू मतदारांनी मतपेटीतून त्यांना धोबीपछाड केल्याचे चित्र प्रकर्षांने पुढे आले आहे.
सांगलीत प्रतिक पाटील आघाडीवर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहमंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला बळ देऊनही काँग्रेसचे प्रतिक पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात नवव्या फेरीअखेर २६ हजार ८२९ मतांची निर्णायकी आघाडी घेतली आहे. प्रतिक पाटील यांना एक लाख ७५ हजार २९०, तर अजित घोरपडे यांना एक लाख ४८ हजार ६१ इतकी मते मिळाली आहेत.