Leading International Marathi News Daily
शनिवार, १६ मे २००९
(सविस्तर वृत्त)

रामदास आठवलेंना पराभवाचा धक्का
नगरमध्ये कर्डिले-गांधींमध्ये चुरस
नगर, १६ मे/प्रतिनिधी

 

जिल्ह्य़ातील शिर्डी व नगर अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघांत भाजप-शिवसेना युतीने जोरदार मुसंडी मारली. शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी निर्णायक आघाडी घेत काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्यावर मोठय़ा मताधिक्याने विजय नोंदवला. नगर मतदारसंघात सुरुवातीला पिछाडीवर गेलेले भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी नंतरच्या फेऱ्यांमध्ये मात्र मोठे मताधिक्य घेत विजयाच्या आशा पल्लवित केल्या.
शिर्डी मतदारसंघात ९ फेऱ्यांअखेर वाकचौरे यांनी आठवले यांच्यावर ५० हजार ४२५ हजारांची आघाडी घेत विजय निश्चित केला. शिर्डी व संगमनेरसह सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी पहिल्यापासून निर्णायक आघाडी घेत ती वाढवत नेली. शिर्डीत मोजणीच्या २१ फेऱ्या होणार असून, उर्वरित १३ फेऱ्यांमध्ये वाकचौरे यांचे मताधिक्य प्रचंड वाढेल.
नगर मतदारसंघात ९व्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना १ लाख ३७ हजार ६५१ व गांधी यांना १ लाख १६ हजार ५०८ मते मिळाली होती. यावेळी कर्डिले १ हजार १४३ मतांनी आघाडीवर होते. पहिल्या ३ फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी ६ ते ७ हजारांची आघाडी घेतली होती. मात्र, पुढच्या फेऱ्यांमध्ये दिलीप गांधी यांनी मोठी मुसंडी मारली. सहाव्या फेरीअखेर कर्डिले यांना ९२ हजार २५५, तर दिलीप गांधी यांना ८७ हजार ५५३ मते होती. त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये मात्र गांधी यांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू केली. काँग्रेसचे बंडखोर (अपक्ष) राजीव राजळे यांना या फेरीअखेर ३५ हजार मते मिळाली होती. नगर मतदारसंघात एकूण २५ फेऱ्या होणार असून, गांधी यांचे मताधिक्य वाढत राहील, अशीच स्थिती आहे.
गोंधळामुळे मतमोजणीला उशीर
दरम्यान लोकसभेच्या नगर व शिर्डी मतदारसंघांच्या मतमोजणीस आज सकाळी गोंधळात प्रारंभ झाला. कोंदट वातावरणामुळे कर्मचारी सकाळीच घामाघुम झाले. त्यामुळे पहिली फेरी जाहीर होण्यास सकाळीचे ९.२० वाजले.
आज सकाळी ८ वाजता एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणीच्या ठिकाणी पुरेशी जागा नसल्याने उमेदवारांच्या प्रतिनिधींना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत असून, या व्यवस्थेमुळे त्यांच्यात नाराजी पसरली आहे.
मतमोजणी केंद्रात प्रथमपासून नगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजीव राजळे, शिर्डीतील शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, अपक्ष उमेदवार प्रेमानंद रुपवते, काँग्रेस आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांचे प्रतिनिधी अशोक गायकवाड, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे हजर होते.
शिर्डी मतदारसंघाची पहिली फेरी निवडणूक निर्णय अधिकारी बाबूराव केंद्रे यांनी सकाळी ९.३० वाजता जाहीर केली, तर दुसरी फेरी १०.२० वाजता जाहीर झाली. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी करण्यात येत असून, फेरी जाहीर करण्यापूर्वी एकूण मतांची क्रॉस चेकिंग केली जात आहे. टपालाद्वारे झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू झाली.
मतमोजणीसाठी नेमलेले कर्मचारी, पोलीस, उमेदवारांचे प्रतिनिधी यांची एकच गर्दी केंद्रात झाली होती. त्यामुळे गोंधळात भर पडत होती. तापमानाचा पारा जसजसा वाढत होता, तसेतसे आतील कर्मचारी बेचैन होत होते.